चंद्रपूर: अवैध पशु वाहतुकीविरोधात चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कत्तलीच्या उद्देशाने नेले जाणारे १२ गोवंश मुक्त केले असून, या प्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली ४ पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. (चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागात एमडी पावडर जप्त)
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला एका खात्रीशीर सूत्राकडून अवैध गोवंश वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दिनांक १७ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जांभूळघाट नेरी टी-पॉईंट येथे नाकेबंदी करून सापळा रचला. सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास संशयास्पद स्थितीत येणारी चार पिकअप वाहने पोलिसांनी अडवून त्यांची तपासणी केली. यामध्ये एमएच ४० एके १०३६, एमएच ३४ एव्ही १५८०, एमएच ४० वाय ७५९४ आणि एमएच ३४ बीजी ६७८१ या क्रमांकाच्या वाहनांचा समावेश होता.
पोलिसांनी या वाहनांची झडती घेतली असता, त्यात १२ गोवंश (बैल) अत्यंत क्रूरपणे, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता डांबून ठेवल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासानुसार, या बैलांची कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी तात्काळ सर्व गोवंशांची सुटका केली आणि पुढील संगोपनासाठी त्यांना चिमूर तालुक्यातील ‘तपोवनी वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज गोशाळा, गोंदेडा’ येथे सुरक्षितपणे दाखल केले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी वाहनातील ७ जणांना अटक केली आहे, जे सर्व आरोपी शेजारील भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यामध्ये दीपक योगराज कांबळे (वय २५, रा. किटाली, तह. लाखनी), मधुकर सोमाजी समरत (वय ६६, रा. काथुर्ली, तह. पवनी), हरिदास तुकाराम माहुरे (वय ३०, रा. भावड, तह. पवनी), राजहंस आत्माराम नागपुरे (वय ४६, रा. पाथरी, तह. पवनी), राजकुमार दाजीराव मारबते (वय ६६, रा. पाथरी, तह. पवनी), चैतन्य विठ्ठल गजापुरे (वय २८, रा. विरली खंदार, तह. पवनी) आणि गंगाधर रामकृष्ण मस्के (वय ४२, रा. काथुर्ली, तह. पवनी) यांचा समावेश आहे. या कारवाईत ४ पिकअप वाहने आणि १२ गोवंश असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवादार नितीन कुर्जेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, दिनेश आदापुरे आणि पोलीस अंमलदार अमोल सावे यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Leave a Comment