Cattle Smuggling । ३९ गोवंश आणि २२ लाखांचा मुद्देमाल; नागपूरच्या तस्कराने चंद्रपुरात कसा घातला धुमाकूळ?

March 16, 2026 by Prakash Hande

Cattle Smuggling : सावली (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सावली पोलिसांनी गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई करत ३९ गोवंशीय जनावरांची सुटका केली. सावली आणि सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी तोडून पळणाऱ्या आयशर ट्रकचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून ट्रक पकडला. या कारवाईत सुमारे २२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला अटक करण्यात आली, तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. (चंद्रपूर जिल्ह्यातून ४ अल्पवयीन मुली बेपत्ता)

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजताच्या सुमारास सावली पोलीस पथक रात्रीची गस्त घालत असताना व्याहाडकडून सावलीकडे येणारा टाटा कंपनीचा आयशर ट्रक (क्रमांक TS-09-UB-8387) संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने ट्रक न थांबवता सावली पोलीस स्टेशनसमोरील बॅरिकेड्सला धडक देत मूल रोडवरून सिंदेवाहीकडे पळ काढला.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले आणि स्वतः वाहनाने ट्रकचा पाठलाग सुरू केला. सिंदेवाही येथेही आरोपीने दुसरे बॅरिकेड्स तोडून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिंदेवाही शहराबाहेर ट्रकचे हेडलाईट फुटल्याने आणि पोलिसांच्या सततच्या पाठलागामुळे आरोपीला ट्रक थांबवावा लागला.

 

यावेळी पोलिसांनी शाबीर दाऊत अली (वय ४२ वर्षे, रा. यशोधरा नगर रोड, नागपूर) याला ताब्यात घेतले. तर त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला.

तपासात ट्रकमध्ये ३९ गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे, चारा-पाण्याविना कोंबून कत्तलीसाठी नेली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षितरित्या चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’ गोशाळेत पाठविण्यात आले.

 

जप्ती व कारवाई

  • अटक आरोपी : शाबीर दाऊत अली (४२), रा. यशोधरा नगर रोड, नागपूर

  • सुटका केलेली जनावरे : ३९ गोवंशीय जनावरे (किंमत अंदाजे ३,९०,००० रुपये)

  • जप्त वाहन : टाटा आयशर ट्रक (किंमत अंदाजे १९,००,००० रुपये)

  • एकूण मुद्देमाल : २२,९०,००० रुपये

गुन्हे दाखल

या प्रकरणी सावली पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा कलम ५(अ)९ व ११, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (घ), (ड), (ज), (झ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३ तसेच मोटार वाहन अधिनियम कलम २३९, १७७, ८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Crime News Chandrapur

 

पोलिस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

+