Chandrapur Mayor Election Result : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी काल रात्री सुमारे एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर सत्तास्थापनेचा राजमार्ग मोकळा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (भाजपचा व्हीप जारी)
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तेचा दीर्घकाळ चाललेला पेच अखेर संपुष्टात येताना दिसत आहे. भाजप, उबाठा गट आणि मित्र पक्षांच्या सहकार्याने सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चंद्रपूर शहरात भाजपचा महापौर बसावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्नशील होते.
आमदार जोरगेवार हे उबाठा गट तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने संपर्कात होते. मात्र उबाठा गटाची भूमिका स्पष्ट न झाल्याने सत्तास्थापनेचा तिढा वाढला होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती.
त्यानंतर काल रात्री एक वाजताच्या सुमारास पुन्हा मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
Leave a Comment