Chandrapur Tender Scam । तुम्ही कर भरता, अधिकारी डल्ला मारतात? पप्पू देशमुखांनी उघड केला ५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशय

March 28, 2026 by Prakash Hande

Chandrapur Tender Scam : चंद्रपूर : मनपाचे यापूर्वीचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी पद व अधिकाराचा दुरुपयोग करून कंत्राटदारांमध्ये दहशत निर्माण केली आणि मर्जीतील कंत्राटदारांना चढ्या दराने कामे दिल्याचा गंभीर आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 27 मार्च रोजी झालेल्या स्थायी समिती व अर्थसंकल्पीय सभेत केला. पालीवाल यांच्या या 'टेंडर टेररिझम'ची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दिला. त्यानुसार सभापती मनस्वी गिऱ्हे व महापौर संगीता खांडेकर यांनी पालीवाल यांच्या कारकीर्दीतील सर्व वादग्रस्त कामांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अकनुरी नरेश यांना दिले. (कबड्डीच्या सामन्यात आला रील स्टार)

 

काय आहे टेंडर टेररिझम?

निविदा प्रक्रियेत मर्जीतील कंत्राटदारांच्या सोयीने अटी-शर्ती घालणे, इतर इच्छुक कंत्राटदारांवर दबाव टाकून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढणे, पात्र असूनही हेतुपुरस्सर अपात्र ठरवणे, मुदत संपल्यानंतरही मर्जीतील कंत्राटदारांना वारंवार मुदतवाढ देणे आणि अंदाजपत्रकापेक्षा जादा कामे देणे — असे गंभीर गैरप्रकार पालीवाल यांनी केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

 

वादग्रस्त कामांची यादी

बागला चौक रस्ता दुभाजक, शहरातील फाउंटेन उभारणी, वाहन पुरवठा, नाली सफाई, एलईडी स्क्रीन, पाणीपुरवठा योजना, गार्डन मेंटेनन्स तसेच मे. लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला दिलेले सुमारे 500 कोटी रुपयांचे भूमिगत गटार योजनेचे काम यांसह अनेक वादग्रस्त कामातील गैरप्रकारचे पुरावे उपलब्ध असल्याचे देशमुख यांनी स्थायी समिती व अर्थसंकल्पीय सभेत नमूद केले.

 

Leave a Comment

+