तेंदूपत्ता संकलन जीवावर बेतले: सिंदेवाहीत 2026 मधील सर्वात मोठा वाघाचा हल्ला

May 22, 2026 by Prakash Hande

सिंदेवाही (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष उफाळून आला आहे, २२ मे रोजी सकाळी गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला ठार झाल्या असून घटनास्थळी गावकरी व वनविभाग सह पोलिसांची चमू दाखल झाली आहे.  (तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला)

 

तेंदूपत्त्याचा हंगाम सुरु होताच, तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गावकरी जंगलात जातात, वाघाच्या कॉरिडॉर मध्ये तेंदुपत्त्यांची झाडे असल्याने नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जंगलात जातात. मागील वर्षी तेंदूपत्ता हंगामात वाघांचे हल्ल्यात वाढ झाल्याने वनविभागाने जंगलात जाऊ नका असे निर्देश नागरिकांना दिले होते.

 

मात्र वनविभागाचे निर्देश चुकवीत पहाटे नागरिक जंगलात जात तेंदूपत्ता संकलन करीत आहे, आज २२ मे रोजी सकाळच्या सुमारास काही महिला गुंजेवाही च्या जंगलात गेल्या होत्या, तेंदूपत्ता गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर हल्ला केला, असून त्यामध्ये ४५ वर्षीय कवडूबाई दादाजी मोहुर्ले, ४० वर्षीय अनिताबाई दादाजी मोहुर्ले, ५० वर्षीय संगीता संतोष चौधरी व ३८ वर्षीय सुनीता कौशिक मोहुर्ले यांचा समावेश आहे.महिलांवर एकाच वाघाने हल्ला केला कि अजून वाघ त्याठिकाणी होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. वर्ष २०२६ च्या ५ महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षात एकूण १९ नागरिकांचा बळी गेला आहे.

Leave a Comment

+