२५ लाख घ्या, जीव द्या! डॉ. गावतुरेंचे वनविभागाला थेट आव्हान

May 22, 2026 by Prakash Hande

Forest Negligence : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात आज सकाळी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या थरारक आणि हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानवी-वन्यजीव संघर्षाचा भडका उडाला असून गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. (रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार)

 

घटनेची माहिती मिळताच भूमिपुत्र ब्रिगेडच्या नेत्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी तातडीने गुंजेवाही गावाला भेट देऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी वनविभागाच्या आणि सरकारच्या नाकर्तेपणावर कडाडून टीका करताना डॉ. गावतुरे यांनी थेट मुख्य वनसंरक्षकांना (CCF) २५ लाख रुपयांचा चेक घेण्याचे जाहीर आव्हान दिले. "जर आमच्या सर्वसामान्य, गरीब कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या जीवाची किंमत सरकार आणि वनविभागाच्या नजरेत फक्त २५ लाख रुपये असेल, तर हे घ्या २५ लाख रुपये आणि तुम्ही स्वतःचा जीव देऊन दाखवा; तुमच्याही जीवाची किंमत आम्ही २५ लाखच देऊ," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

 

यानंतर डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात शेकडो संतप्त ग्रामस्थांनी सिंदेवाही पोलीस स्टेशनवर धडक दिली. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप करत, त्यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि पोलिसांत तक्रार नोंदवली. यापूर्वीही गेल्या वर्षी मूल तालुक्यातील चिचोली गावात वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असता, डॉ. गावतुरे यांनी गावकऱ्यांसह मूल पोलीस ठाण्यात वनविभागाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनांशिवाय काहीही ठोस मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, ब्रह्मपुरी आणि आसपासच्या घनदाट वनक्षेत्रांमुळे वाघांचा मुख्य अधिवास मानला जातो. मात्र, वनक्षेत्रातील वाढती मानवी ढवळाढवळ, वन्यजीवांच्या नैसर्गिक शिकारीची कमतरता आणि वनविभागाचे ढिसाळ व्यवस्थापन यामुळे हा संघर्ष विकोपाला पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात १०० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात वनोपज संकलन आणि शेतीकामासाठी जंगलात जाणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

 

भूमीपुत्र ब्रिगेडने वनविभागाच्या दुटप्पी धोरणावर आणि रिक्त जागांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकीकडे सरकार ताडोबाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि प्रवेशद्वारांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे, तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या वनरक्षकांच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. ज्या काही जागा भरल्या जातात, त्या कंत्राटी पद्धतीने भरून तरुणांची फसवणूक केली जात आहे. "एकीकडे वाघांच्या हल्ल्यात आमची माणसे मरत आहेत आणि दुसरीकडे जागा रिक्त असूनही आमचे तरुण बेरोजगार फिरत आहेत," असा घणाघात डॉ. गावतुरे यांनी केला.

 

यावेळी भूमिपुत्र ब्रिगेड आणि ग्रामस्थांनी संवेदनशील वनक्षेत्रात प्रभावी विद्युतीकरण, सौर कुंपण आणि नियमित पाळत ठेवण्याची यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. "आम्ही वाघांसोबत आणि निसर्गासोबत शांततेने राहू इच्छितो, पण आमच्या जीविताला असाच धोका निर्माण होत राहिला, तर आम्ही शांत बसणार नाही," असा इशारा स्थानिक गावकऱ्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. ही घटना वनव्यवस्थापनाच्या अपयशाची परिसीमा असून, शासनाने तातडीने ठोस पावले न उचलल्यास हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

+