Chandrapur Ward Development : चंद्रपूर : "जनसेवेसाठी कोणत्याच पदाची मोहताज नसते, गरज असते ती फक्त कामाच्या जिद्दीची," हे विठ्ठल मंदिर वॉर्डातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार राधा पुलगमकर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मतदार राजांनी कौल दिला नसला, तरी त्यांनी हार न मानता त्याच जोशाने वॉर्डातील विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. जनसेवेचा वसा घेतलेल्या राधा पुलगमकर यांनी निवडणुकीनंतर शांत न बसता, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या या निस्वार्थ प्रयत्नांना आता मोठे यश आले आहे. (चंद्रपुरातील रेल्वे समस्यांबाबत खासदारांचा पाठपुरावा)
यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका संगीत अमृतकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय येरावार, राजू वनकर, अतुल ठाकरे, प्रदीप वानखेडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, सचिन शिवणकर, राहुल तायडे, रमेश खडके यासह अनेक प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष सहकार्यातून विठ्ठल मंदिर प्रभागातील विकासकामांना मोठी गती मिळाली आहे. खासदार निधीतून मंजूर झालेल्या १५ लक्ष रुपयांच्या निधीतून प्रभागातील महत्त्वपूर्ण रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामध्ये घनिष्ठ आटा चक्की ते श्री. पडगिलवार आणि तेथून पुढे श्री. नितीन जाधव यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रोडच्या कामाचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नामुळे नागरिकांना होणारा त्रास आता कायमचा दूर होणार असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या विकासकामामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, पराभवानंतरही खचून न जाता जनतेसाठी धावून येणाऱ्या राधा पुलगमकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. "निवडणुकीत पद मिळाले नाही तरी चालेल, पण माझ्या वॉर्डातील नागरिकांचे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी शिदोरी आहे," अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवण्यासाठी आपला हा संघर्ष आणि कामाचा झंझावात असाच सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
Leave a Comment