Wildlife Overpass । NH 930 वर वन्यजीवांचे बळी थांबणार? खासदार प्रतिभा धानोरकरांनी उचलले मोठे पाऊल!

March 20, 2026 by Prakash Hande

Chandrapur Wildlife Overpass : चंद्रपूर: चंद्रपूर-मूल या संवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर (NH 930) वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकहितकारी मागणी केली आहे. या महामार्गावर कोळसा आणि सिमेंट वाहतुकीमुळे जड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून, वाहनांच्या अतिवेगवान गतीमुळे वाघ, बिबट्या व अस्वल यांसारख्या दुर्मिळ वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ही परिस्थिती केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर मानवी सुरक्षेसाठीही अत्यंत धोक्याची बनली आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून तातडीने 'वन्यजीव ओव्हरपास' मंजूर करावेत, अशी मागणी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. (गडचांदूर पोलिसांना अवैध धंदे व्यावसायिकांचे आव्हान)

 

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर-पेन्च राष्ट्रीय महामार्गावरील (NH-7) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वन्यजीव ओव्हरपासचा दाखला देत स्पष्ट केले की, विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. केवळ तात्पुरते उपाय किंवा वाहतुकीचे नियम या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाहीत. त्यामुळे NH 930 वरील ज्या संवेदनशील पट्ट्यांमध्ये वन्यजीवांचा वावर सर्वाधिक आहे, तिथे 'पेन्च मॉडेल'च्या धर्तीवर सर्वोच्च प्राधान्याने तातडीने 'वन्यजीव ओव्हरपास'चे निर्माण करण्यात यावे, असा आग्रह त्यांनी पत्राद्वारे धरला आहे.

 

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळवण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने पर्यावरण व वन मंत्रालयाशी त्वरित समन्वय साधावा आणि आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. अभियांत्रिकी दृष्टिकोनातून सक्षम असलेल्या या उपाययोजनेमुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होईल आणि या क्षेत्राचा नैसर्गिक वारसा सुरक्षित राहील, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

+