Child Heart Attack News : ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वॉर्डात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या १० वर्षांच्या ईशान सत्यपाल आत्राम या चिमुरड्याचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. (राणी हिराई महोत्सवात खासदार धानोरकरांचा अपमान)
मिळालेल्या माहितीनुसार, ईशान नेहमीप्रमाणे सकाळी उठून शाळेसाठी तयार होत होता. आंघोळ करून गणवेश घातल्यानंतर तो घरातच तयारी करत असताना सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. ही घटना पाहताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईशान हा स्थानिक लो. टी. प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. एवढ्या लहान वयात हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
ईशानच्या पश्चात आई-वडील, भाऊ तसेच मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे देलनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Comment