Desi Katta Seized : बल्लारपूर - बल्लारपूर शहरात अवैध शस्त्र जप्तीच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे, पोलिसांच्या कारवाई नंतरही शहरात अवैध शस्त्र जप्ती करण्याची मालिका सतत सुरु आहे. १८ एप्रिल रोजी पोलिसांनी १ देशी कट्टा व ४ जिवंत काडतुसे सह चौघांना अटक केली आहे. आतापर्यंत बल्लारपुरात देशी कट्ट्याच्या ५ कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी सांगितले.
वस्ती विभागातील किल्ला वॉर्ड परिसरात एका तरुणाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्या तरुणाने दुसऱ्या व्यक्तीचे नाव सांगितले आणि अशा प्रकारे चौकशीची साखळी पुढे सरकत गेली. या “चेन सिस्टम”च्या माध्यमातून पोलिस चौथ्या आरोपीपर्यंत पोहोचले.
तपासादरम्यान चौथा आरोपी अनुराग आनंदराव मातंगी (वय १९, रा. गणपती वॉर्ड, बल्लारपूर) याच्याकडून एक देशी बनावटीचा माऊजर, पंच, एक खंजर आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर गौरव सुनील कुक्कडकर (वय २१, रा. किल्ला वॉर्ड), बालाजी उर्फ कार्तिक शिवा मोहुर्ले (वय १९, रा. शिवापूर, ता. कागजनगर, जि. आसिफाबाद, तेलंगणा) आणि विष्णू भास्कर वलसा (वय १९, रा. रेल्वे वॉर्ड, बल्लारपूर) या चारही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार आणि त्यांच्या पथकाने ही संपूर्ण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पोलीस निरीक्षक बिपिन इंगले यांनी सांगितले की, आतापर्यंत अवैध देशी कट्टा संदर्भातील पाच प्रकरणांमध्ये विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. “कोणतीही मोठी घटना घडण्याआधीच ती रोखणे हे पोलिसांचे प्राधान्य असते, आणि या कारवाईमुळे एक संभाव्य गुन्हा वेळेत टाळण्यात आला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सध्या बल्लारपूर पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींकडे हे बेकायदेशीर शस्त्र कुठून आले आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
Leave a Comment