चंद्रपुरात पाण्याच्या प्लांटच्या नावाखाली 'भलताच' कारभार! एलसीबीचा मोठा 'सर्जिकल स्ट्राईक

February 08, 2026 by Prakash Hande

Illegal Liquor Raid : सावली : सावली पोलीस स्टेशन हद्दीतील व्याहाड बुद्रुक येथे अवैध देशी व विदेशी दारूच्या साठा व वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या खबरीच्या माहितीवरून करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १५ लाख ९४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (लग्न कार्यासाठी गेले आणि होत्याचे नव्हते झाले, अभियंत्याचे घर लुटले)

आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सावली पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, व्याहाड बुद्रुक येथील महेश गड्डमवर (रा. व्याहाड बुद्रुक) हा त्याच्या परिणीती ट्रान्सपोर्ट – एक्वा चिल्ड वॉटर या नावाच्या ऑफिस व गोडाऊनमधून लाल रंगाच्या हुंडाई क्रेटा कारमधून देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार आहे.

या माहितीच्या आधारे मूल विभागातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष कार, संबंधित ऑफिस व गोडाऊनची झडती घेतली. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध दारू व इतर साहित्य आढळून आले. Illegal Liquor Raid यामध्ये

  • ३८०० नग देशी दारूच्या ९० मिलीच्या शिष्या (किंमत ₹१,५२,०००),

  • ३८४ नग रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या १८० मिली शिष्या (मध्य प्रदेश) (किंमत ₹९९,८४०),

  • ९६ नग रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या १८० मिली शिष्या (महाराष्ट्र) (किंमत ₹२४,०००),

  • १४४ नग हावर्ड्स ५००० कंपनीचे ५०० मिली कॅन (किंमत ₹१८,७२०),

  • दुकानाच्या ड्रॉवरमधील रोख रक्कम ₹२,९५,४१०,

  • सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (किंमत ₹५,०००),

  • तसेच लाल रंगाची हुंडाई क्रेटा कार (MH 40 AR 2365) (किंमत ₹१०,००,०००)
    असा एकूण ₹१५,९४,९७०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सावली पोलीस स्टेशन येथे आरोपीविरोधात म.दा.का कलम ६५ (ई) तसेच बीएनएस कलम ३३६(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत. सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Leave a Comment

+