चंद्रपूर : NHM Extension Demand या मुद्द्यावर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला केवळ सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून NHM योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) योजनेला केवळ सहा महिन्यांची अल्प मुदतवाढ दिल्याने कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अन्यायकारक निर्णयाची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून या अभियानाला तात्काळ ५ वर्षांची मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी केली आहे. (विद्यार्थ्यांचे स्वप्न हिरावले, लोकवर्गणीतून घेतलेल्या सायकल चोरी)
NHM Extension Demand मागे नेमके कारण काय?
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने २९ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्राचा (No. Z-14011/1/2022-NHM-II) संदर्भ देत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नमूद केले की, वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ केवळ ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. यापूर्वी २०१२ पासून या अभियानाला सलग पाच-पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात येत होती. मात्र, यंदा प्रथमच केवळ सहा महिन्यांची अंतरिम मुदतवाढ देऊन १६ व्या वित्त आयोगाच्या चक्रात या योजनांचे भवितव्य टांगणीला लावले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान ही ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, यांतर्गत लसीकरण, कुपोषण निर्मूलन, माता-बाल मृत्यू दर कमी करणे आणि प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे यांसारखी अत्यंत महत्त्वाची कामे केली जातात. या मोहिमेत कार्यरत असलेले डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेक्निशियन आणि इतर कर्मचारी गेल्या १० ते १५ वर्षांपासून सातत्याने सेवा देत आहेत. विशेषतः, कोविड-१९ सारख्या महाभयंकर संकटात आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता असुरक्षिततेत ठेवणे अत्यंत अयोग्य आहे.
“ज्या कर्मचाऱ्यांनी संकटकाळात देशाला साथ दिली, त्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे. केवळ ६ महिन्यांची मुदतवाढ देणे म्हणजे ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवण्यासारखे आहे,” असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करून, वित्त आयोगाच्या शिफारशींची वाट न पाहता NHM ला पूर्वीप्रमाणेच पुढील ५ वर्षांसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत ठोस व सुरक्षित धोरण निश्चित करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
