Tadoba Fire Prevention : चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जागतिक वन दिन शनिवार २१ मार्च रोजी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील दोन हजाराहून अधिक ग्रामस्थांनी जंगल आगमुक्त राखण्याची शपथ घेतली. प्राथमिक प्रतिसाद पथकाचे (पीआरटी) ३३० सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे १६३ सदस्य आणि १६५ वन अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. ताडोबाच्या बफर वनपरिक्षेत्रांमधील सर्व ९५ गावांमध्ये हा उपक्रम पार पडला. (मानव-वन्यजीव संघर्ष, ३० दिवसात मिळणार आर्थिक सहाय्य)
उन्हाळ्यात जंगलात वणवा लागून शेकडो हेक्टर जंगल जळून खाक होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत मोलाचे असते. त्यामुळे ताडोबा प्रशासनाने वणवा प्रतिबंधक अभियानाअंतर्गत ग्रामस्थांना जंगल आगमुक्त राखण्याची शपथ दिली. यावेळी ग्रामस्थांना वणवा व मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामस्थांना देण्यात आलेली शपथ पुढील मुद्द्यांवर आधारित होती:
• उन्हाळी हंगामात जंगलात किंवा जंगलाजवळ आग लावणे टाळून जंगलांचे आगीपासून संरक्षण करु.
• शेताच्या सीमेची स्वच्छता करण्यासाठी आग लावताना वनअधिका-यांना पूर्वसूचना देऊ.
• आगीची जोखीम किंवा आगीच्या प्रादुर्भावाची माहिती तात्काळ वन विभागाला कळवू.
• शेतात आणि घरी कोरड्या पानांचा आणि तणांचा नायनाट करुन आगी रोखण्यासाठी फायर ब्रेक तयार करु.
• आगीमुळे होणा-या हानीबाबत कुटुंबियांना, मुलांना व शेजा-यांना जागरुक करु.
• जंगलात आग विझवण्याच्या कामात सहकार्य करु.
• • वन विभागाने आयोजित केलेल्या सामुदायिक फायर-वॉच पेट्रोलिंग आणि जागृती मोहिमांमध्ये सहभागी होऊ.
• ‘फायर फ्री ताडोबा’मध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवू.
या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांसह ईडीसी अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, जिप्सी चालक व मालक, मार्गदर्शक आणि वनविभागाचे अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर सहभागी झाले होते.
Leave a Comment