ताडोबा हादरलं! ताडोबाच्या शिवनी झोनमध्ये वाघाचा बछडा रक्ताच्या थारोळ्यात

February 06, 2026 by Prakash Hande

Tiger Death News : चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील शिवनी वनपरिक्षेत्रात दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी एका अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. (वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू)

शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदम व त्यांचे सहकारी, बफर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. डुबे, एनटीसीएचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, तसेच पशुसंवर्धन विभागातील डॉ. विलास गावखरे (मुल), डॉ. बजरंग सवारे (सिंदेवाही) आणि डॉ. कुंदन पोडचेलवार (टीटीसी) यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

प्राथमिक तपासणीत सदर वाघाच्या बछड्याचा मृत्यू दोन वाघांमधील झुंजीत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत बछड्याचा मृतदेह शिवनी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८४२ मध्ये आढळून आला. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यातील वाघाचा हा दुसरा मृत्यू असल्याने वन विभागातही चिंता व्यक्त केली जात आहे. Tiger Death News

घटनास्थळाच्या पाहणीत वाघाच्या मानेवर जखमा आढळून आल्या असून मागील भाग काही प्रमाणात खाल्ल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे सदर मृत वाघ हा नर की मादी, याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढता आला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. एनटीसीएच्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृत वाघाच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत वन विभागाकडून पुढील नोंदी व निरीक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

+