Tiger Death Pathri : ब्रम्हपुरी - पाथरी तालुक्यातील मेहा बिट परिसरातील जंगलात पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने वनविकास महामंडळ विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. (बिबट्याने केला शेतकऱ्यावर हल्ला)
गावातील काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली. पुढे जाऊन पाहणी केली असता कक्ष क्रमांक १६० मधील उपकालवा शेजारील जंगल भागात वाघाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तात्काळ ही माहिती वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागात धावपळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आणि त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक पाहणीत वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
या वेळी विभागीय व्यवस्थापक टी. व्ही. महाडिक (ब्रह्मपुरी), वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एच. पेंद्राम (पाथरी), क्षेत्र सहाय्यक डी. एन. ढोले, तसेच वनपाल व वनरक्षक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सर्वांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
यानंतर वाघाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपासासाठी वाघाच्या अवयवांचे नमुने घेऊन ते रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Leave a Comment