चंद्रपूर : Rajmata Jijau Bus Chandrapur संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चंद्रपूर आगारात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस अधिकृतपणे दाखल झाल्या आहेत. १७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यवर्ती बस स्थानक चंद्रपूर येथे या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शुभहस्ते या बसेस प्रवाशांच्या सेवेत अर्पण करण्यात आल्या. लोकार्पणानंतर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या बसमधून फेरफटका मारून सोयी-सुविधांची पाहणी केली. या नव्या बसेसमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात कोट्यवधींचे बस स्थानक, मात्र शौचालय घाणेरड्या अवस्थेत)
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण
गेल्या ७८ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांचा विश्वास संपादन करून महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ म्हणून नावारूपाला आले आहे. प्रवाशांची गरज आणि सोयीच्या दृष्टीने एसटी महामंडळाने वेळोवेळी बदल करून नवनवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार परिवर्तन करून दाखल करण्यात आलेल्या या नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
या प्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, एसटी महामंडळ ही महाराष्ट्राची खरी लोकवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा तो मुख्य आधार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर आगारास ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस प्राप्त होणे ही चंद्रपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या आधुनिक बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.
यावेळी त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, चंद्रपूर जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यात आणखी नवीन बसेस वाढवण्यात याव्यात, अशी मागणी आपण एसटी महामंडळ व शासनाकडे करणार आहोत. त्याचसोबत बस स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहांपर्यंतच्या सर्व मूलभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या, एसटी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला उत्तम व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या सोहळ्यास विभागीय नियंत्रक अशोक वाडीभस्मे, सह विभागीय नियंत्रक दिवसे, आगर प्रमुख हेमंत गोवर्धन, काँग्रेस गटनेते नगरसेवक सुरेंद्र अडबाले, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, महिला व बालकल्याण उपसभापती सईदा बेगम ताजु शेख, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक विनोद लाभणे, नरसेवक आकाश मानकर, नगरसेविका महानंदा वाळके, नगरसेविका वैशाली महाडूळे, नगरसेविका करुणा चालखुरे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, अजय महाडूळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






