सिकलसेल रुग्ण आरोग्य शिबिरात वाढोणा येथे रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर

कॅरमच्या गोट्यांतून सिकलसेल समजावला; वाढोण्यात शिबिर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 7, 2026

चंद्रपूर : सिकलसेल रुग्ण आरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र, वाढोणा येथे आयोजित करण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानाच्या माध्यमातून हे शिबिर झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात १०३ रुग्णांची तपासणी झाली. रुग्णांना समुपदेशन आणि औषध वितरण करण्यात आले. आनुवंशिकतेचे प्रात्यक्षिक कॅरमच्या गोट्यांद्वारे दाखवण्यात आले. (चंद्रपुरातील ६३ आश्रमशाळेत मुख व दांत तपासणी उपक्रम, वाचा हि बातमी)

सिकलसेल हा आनुवंशिक रक्तविकार असून त्याचे वेळेत निदान, नियमित वैद्यकीय तपासणी, योग्य औषधोपचार, संतुलित आहार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करता येते. याच उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले.

या विशेष शिबिरात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथील माजी प्राध्यापक डॉ. घनश्याम कोडवानी तसेच आयुषचे सहायक संचालक डॉ. धनंजय हांगे यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेऊन त्यांना आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच औषधांचे वितरण करण्यात आले.

कॅरमच्या गोट्यांतून आनुवंशिकतेचे प्रात्यक्षिक

जिल्हा समन्वयक संतोष चात्रेश्वर यांनी सिकलसेल आजाराचे स्वरूप, त्यामागील आनुवंशिक कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच रुग्णांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व सुविधांची माहिती दिली. सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्यामुळे विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सिकलसेल आजाराचा आनुवंशिक वारसा पुढील पिढीकडे कसा जाऊ शकतो, हे सहजपणे समजावे यासाठी कॅरमच्या गोट्यांचा वापर करून प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

सिकलसेल रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा तसेच आजाराशी संबंधित त्रास अथवा लक्षणे जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. साईनाथ भोवरे, नागभीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित बनपूरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल डोरलीकर, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज शेख यांनी तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मुंजनकर, डॉ. गजेंद्र अहिरकर, डॉ. चैतन्य चौधरी, डॉ. विवेक बोळखे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सुरनार यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक संतोष चात्रेश्वर यांनी तर आभार आंबोरकर यांनी मानले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment