चंद्रपूर : Tadoba Airbnb Homestay MoU वर नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि Airbnb यांनी संयुक्तपणे हे पाऊल उचलले आहे.
या कराराचा मुख्य उद्देश स्थानिक होमस्टे चालकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. यामुळे ताडोबाच्या बफर क्षेत्रातील १०० होमस्टेला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळेल.
नागपूर आयआयएम मधील कार्यक्रमात कराराची अधिकृत देवाणघेवाण
शाश्वत समुदाय-आधारित पर्यावरण पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) आणि Airbnb यांच्यात २९ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील आयआयएम (IIM) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन सोहळ्यादरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराचा उद्देश होमस्टे चालकांची डिजिटल सक्षमता वाढविणे, त्यांना अधिक दृश्यमानता मिळवून देणे, तसेच वाढत्या बाजारपेठेत त्यांना संधी मिळवून देणे हा असून, त्याद्वारे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होणार आहे. सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये आणि परिसरात सुमारे १०० होमस्टे कार्यरत आहेत. (हे हि वाचा – ब्रह्मपुरीत कांग्रेसचा जनआक्रोश मोर्चा)
या सामंजस्य कराराची देवाणघेवाण महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. वनमंत्री श्री. गणेश नाईक, श्री. प्रवीण परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्रा, श्री. मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (वने), श्री. एम. श्रीनिवासा राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख आणि श्री. एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
स्थानिक होमस्टे चालकांसाठी डिजिटल कौशल्य विकास कार्यशाळा
या सामंजस्य कराराअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (TATRCF) आणि Airbnb यांच्या संयुक्त विद्यमाने होमस्टे तसेच बेड अँड ब्रेकफास्ट (B&B) चालविणाऱ्या यजमानांसाठी डिजिटल कौशल्य विकास, Airbnb प्लॅटफॉर्मवर नोंदणी आणि क्षमता वृद्धीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या भागीदारीअंतर्गत Airbnb वर नोंदणी, प्रोफाइल तयार करणे, छायाचित्रण, लिस्टिंग ऑप्टिमायझेशन, पाहुण्यांशी प्रभावी संवाद साधणे, तसेच आकर्षक आणि परिणामकारक मालमत्ता वर्णन तयार करण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, देशातील इतर भागांतील होमस्टे व B&B संदर्भातील नियामक चौकट, सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाणही केली जाणार असून, महाराष्ट्रातील समुदाय-आधारित पर्यटनासाठी धोरणात्मक आणि कार्यात्मक परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी TATRCF च्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३० होमस्टेची निवड आणि १५ नोंदणी पूर्ण
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ३० होमस्टेची क्षमता वृद्धी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत १० आणि ११ जुलै २०२६ रोजी पहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला होमस्टे चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्यामुळे आतापर्यंत १५ होमस्टे Airbnb प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत झाले असून, उर्वरित होमस्टे आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत ‘चांदा ते बांदा’ उपक्रमांतर्गत तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाच्या सहकार्याने अनेक होमस्टे चालकांना सुविधा उभारण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प या समुदाय-आधारित होमस्टेची गुणवत्ता, स्वच्छता, आदरातिथ्याची मानके आणि बाजारपेठेतील दृश्यमानता वाढविण्यावर विशेष भर देत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून गौतम बुद्ध विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (IITTM) यांच्या मार्फत विद्यमान अडचणींचा अभ्यास करून होमस्टे परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याचे काम सुरू आहे.
श्री. अमनप्रीत बजाज, कंट्री हेड, भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया, Airbnb म्हणाले,
“भारतातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि संस्मरणीय निवासस्थाने म्हणजे स्थानिक लोकांनी चालवलेली घरे आहेत. आपल्या भूमीचा, परंपरांचा आणि संस्कृतीचा खरा परिचय या स्थानिक यजमानांइतका दुसरा कोणीही करून देऊ शकत नाही. ताडोबा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. TATR सोबतची ही भागीदारी या यजमानांना आवश्यक साधने आणि जागतिक स्तरावर दृश्यमानता उपलब्ध करून देण्यासाठी आहे, जेणेकरून ते जगभरातील पर्यटकांसाठी आपली दारे खुली करू शकतील आणि पर्यटकांना अस्सल स्थानिक अनुभव मिळू शकेल. पर्यटनाचा लाभ जेव्हा या निसर्गसंपन्न परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांपर्यंत थेट पोहोचतो, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने शाश्वत ठरते.”
श्री. प्रभू नाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणाले,
“समुदायाच्या मालकीचे होमस्टे हे शाश्वत पर्यावरण पर्यटनाचे केंद्रबिंदू आहेत. क्षमता वृद्धी आणि डिजिटल पोहोच वाढविण्यासाठी Airbnb सारख्या जागतिक प्लॅटफॉर्मसोबतची भागीदारी ताडोबा परिसरातील होमस्टेची गुणवत्ता आणि दृश्यमानता लक्षणीयरीत्या वाढवेल. या उपक्रमामुळे स्थानिक समुदायासाठी अधिक रोजगार व उपजीविकेच्या संधी निर्माण होतील, पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होईल आणि समुदायाच्या सक्रिय सहभागातून वन्यजीव संवर्धनालाही अधिक बळ मिळेल.”
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






