चंद्रपूर – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून (VNVJNT Loan Scheme) एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महामंडळ व त्याच्याशी संलग्न असलेल्या इतर सहा महामंडळांमार्फत तरुणांना स्वयंरोजगारासाठी मोठी आर्थिक मदत दिली जात आहे. या अंतर्गत लघुउद्योग, कृषी संलग्न व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्रासाठी १५ लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज पुरवठा केला जात आहे. पात्र इच्छुकांनी ऑनलाईन पोर्टलवर तात्काळ अर्ज सादर करावेत. (मागासवर्गीय आणि दिव्यांग बांधवासाठी कल्याणकारी योजना)
VNVJNT Loan Scheme: नवीन व्यवसायासाठी ५० लाखांपर्यंत आर्थिक मदत
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासह त्याच्याशी संलग्न असलेल्या इतर सहा महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी सलंग्न व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधीत व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनांनमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे. त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म 12 टक्केपर्यंत लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करते. तसेच बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत (बँक सहभाग 75 टक्के व महामंडळ सहभाग 25 टक्के) महामंडळाच्या 25 टक्के सहभागावर 4 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येते. थेट कर्ज योजने अंतर्गत 1 लक्ष रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या WWW.VNVJNT.ORG या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
अधिक माहितीकरीता महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांनी केले आहे.
संलग्न असलेली महामंडळे : वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, लोहार समाजासाठी ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, नाथपंथी समाजासाठी श्री. शिव गोरक्षणाथ आर्थिक विकास महामंडळ
येथे करा संपर्क : जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रयतवारी रोड, जलनगर, आर.टी. ओ ऑफिस जवळ, चंद्रपूर. दूरध्वनी क्र. 07172-271661
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






