Bahelia gang on tiger hunting
Bahelia gang on tiger hunting : राज्यात सर्वात जास्त वाघ असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाघांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते, आता नव्या वर्षात वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या राजुरा तालुक्यात आढळल्याने जिल्ह्यातील वाघांची शिकार झाली का? याबाबत वनविभागात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात 4 वाघांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या तपासात आता काय नवी माहिती उघडकीस येणार याकडे लक्ष लागले आहे.
वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय आहे. या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार होते. वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने 2015 मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती.
त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून न्यायालयाने अजितला शिक्षा ठोठावली होती. मात्र सप्टेंबर 2024 मध्ये अजित जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. मात्र अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे ? त्याने या भागात वाघांच्या शिकारी केल्या का? त्याच्या टोळीचे आणखी किती लोकं या भागात आहे? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वन विभागाचं विशेष पथक अजितची कसून चौकशी करत आहे.
