Chandrapur highway hit and run case
Chandrapur highway hit and run case : वरोरा, चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५): वरोरा-नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आनंदवन चौकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला (स्कूटर) धडक दिल्याने ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. धडकेनंतर ट्रकने ॲक्टिवा स्कूटरला सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. हा अपघात २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन
अपघाताची माहिती
पौर्णिमा प्रमोद कोल्हे (वय ३०, रा. देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागे, वरोरा) या त्यांच्या MH-34 CK 7880 क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने नागपूर-चंद्रपूर मार्गावरून आनंदवन चौकाकडे जात होत्या. त्याचवेळी, नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ॲक्टिवाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे पौर्णिमा कोल्हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या.
ट्रक चालक फरार
ट्रकने महिलेला धडक दिल्यानंतर तो न थांबता ॲक्टिवाला फरफटत घेऊन गेला. सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटल्यानंतर ॲक्टिव्हा जळून खाक झाली. यानंतर ट्रक चालक आपला ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
स्थानिकांनी तातडीने जखमी महिलेला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरोरा पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
