चंद्रपूर मनपा निवडणूक; भाजपची रणनीतीवर सखोल चर्चा

BJP Local Body Election : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरची आज शनिवारी गांधी चौक येथील महानगर कार्यालयात महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच शहराच्या विकासाचा आराखडा यावर सखोल चर्चा करण्यात आली. (चंद्रपुरात बच्चू कडू, किडनी विक्री प्रकरणातील शेतकऱ्याची घेतली भेट)

या बैठकीला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर  महामंत्री मनोज पाल, रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, श्याम कनकम, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, प्रदीप किरमे, अ‍ॅड. सारिका संदुरकर, विनोद शेरकी आदींची प्रमुख उपस्थिती होती. BJP Local Body Election

यावेळी बोलताना हंसराज अहिर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली चळवळ आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणात चंद्रपूर शहराच्या विकासाचा उल्लेख करत सांगितले की, महानगरपालिकेतील सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनासाठी भाजपचे नेतृत्व आवश्यक आहे. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व रोजगार या विषयांवर भाजपची ठोस भूमिका असून ती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत चंद्रपूर शहरात भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Leave a Comment