चंद्रपूर मनपा निवडणूक कामात कसूर नको; आयुक्तांचे स्पष्ट आदेश

Chandrapur Corporation Election : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मनपा प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली असुन विविध कामांसाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व यंत्रणांनी निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत, अशा सुचना निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिल्या. (२२ डिसेंबर ला कांग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती)

   मनपा कार्यालयात आयोजित नोडल अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे आयुक्त अकुनुरी नरेश म्हणाले, निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचा-यांनी योग्य रितीने आपले कर्तव्य बजावावे. यासाठी सुक्ष्म नियोजन करा. निवडणुकीच्या कामांमध्ये कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. त्यासाठी पुर्वतयारी करून ठेवा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

   यावेळी मतदान कर्मचारी / मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, साहित्य मागणी व वितरण, मतपत्रिका, मतदार यादी, वाहन व्यवस्थापन, संगणक सुरक्षा आयटी ॲप्लीकेशन, मतदार जनजागृती, कायदा-सुव्यवस्था व सुरक्षा नियोजन, ईव्हीएम मशीन व्यवस्थापन, आचारसंहिता / ऑनलाईन तक्रार निवारण, खर्च नियंत्रण, टपाली मतपत्रिका छपाई, माध्यम व सनियंत्रण, समन्वय जिल्हा निवडणूक संपर्क कक्ष, तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष व नियंत्रण कक्ष, निवडणूक निरीक्षक, दिव्यांग मतदार मदत व सनियंत्रण कक्ष आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. Chandrapur Corporation Election

   बैठकीला अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम,उपायुक्त संदीप चिद्रावार,शहर अभियंता रवींद्र हजारे,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,संतोष गर्गेलवार,उपअभियंता रवींद्र कळंबे, समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे,सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, चैतन्य चोरे,सिद्दिक अहमद आदी उपस्थित होते.

      चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत एकूण  प्रभागांची संख्या १७ असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या ६६ आहे. या निवडणुकीसाठी एकूण मतदार लोकसंख्या २ लक्ष ९९ हजार ९९४ असुन पुरुष मतदार संख्या १ लक्ष ४९ हजार ६०९, महिला मतदार संख्या १ लक्ष ५० हजार ३५४ तर इतर मतदार संख्या ३१ आहे.  

Leave a Comment