Compassionate appointment : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) : आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रलंबित प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळणार आहे. गेली अनेक वर्षे न्याय मिळण्याची वाट पाहणाऱ्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्याला गमावलेल्या कामगार कुटुंबियांच्या या प्रश्नाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर निर्णय घेण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी काढण्याची विनंती केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत संरक्षण मंत्र्यांनी चांदा येथील कामगार कुटुंबियांना मोठा दिलासा देणारे आश्वासन दिले आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपा आयुक्तांनी दाखविला शिस्तीचा IAS पॅटर्न)
संरक्षण मंत्र्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी मंजूर करून असे आश्वासन दिले असून, आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा धारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण आश्वासनानुसार, गेल्या तीन वर्षांपासून नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि आवश्यक लिखित परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेल्या २३ अनुकंपा धारकांना कोणतीही दिरंगाई न करता त्वरित नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, निगमीकरण प्रक्रियेमुळे नियुक्तीसाठी पात्र नसलेल्या उर्वरित सर्व अनुकंपा धारकांना देखील दिलासा मिळाला आहे. Compassionate appointment
या सर्व उर्वरित अनुकंपा धारकांना ‘वन-टाईम रिलॅक्सेशन’ च्या माध्यमातून १००% अनुकंपा तत्वावर समायोजित करण्याची मागणी देखील संरक्षण मंत्र्यांनी स्वीकारली आहे. ती त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून संबंधित यंत्रणेला हा प्रश्न त्वरित मार्गी काढण्याचे निर्देश यावेळी संरक्षण मंत्र्यांनी दिले.
या आश्वासनाबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, “हा निर्णय केवळ २३ किंवा त्याहून अधिक कुटुंबांना नोकरी देणारा नाही, तर अनेक वर्षांपासून न्याय मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेकडो कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक आधार देणारा आहे. त्यांच्या संघर्षाला अखेर यश येणार असून, त्यांचे शोषण थांबले आहे.” हे आश्वासन चांदा येथील कामगार कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होणार आहेत.










