Gau protection Maharashtra : नागपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) : विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गोवंश संरक्षण, पोषण व व्यवस्थापनासंदर्भात शासनाकडे तीन महत्वपूर्ण मागण्या मांडत सभागृहाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. भाकड व वृद्ध गोवंशासाठी शासकीय जमिनींवर स्वतंत्र कुरणे विकसित करण्यासाठी कालबद्ध व ठोस कार्यक्रम राबवावा, सन १९६१ मधील व आजच्या जनावरांच्या संख्येच्या तुलनात्मक आकडेवारीच्या आधारे भविष्यातील चारा उपलब्धता, कुरण विकास व पोषण व्यवस्थेचे नियोजन करावे, तसेच वाढती खर्चिक स्थिती व चारा टंचाईमुळे अडचणीत आलेल्या गरीब शेतकऱ्यांना गोवंश संगोपनासाठी शासकीय सहाय्य किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा तीन ठोस मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या. (हे वाचा – शेतात काम करताना युवा शेतकऱ्याचा मृत्यू)
राज्य विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आज गोवंश संरक्षण, पोषण व व्यवस्थापनासंदर्भात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. गोवंश रक्षणासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांनी शासनाचे मनापासून अभिनंदन केले. स्वातंत्र्यानंतरची ही गोवंश रक्षणासाठीची सर्वात मोठी आर्थिक तरतूद असून, या निर्णयामुळे मुक्या जनावरांचा आशीर्वाद शासनाला निश्चितच लाभेल, असा विश्वास त्यांनी सभागृहात व्यक्त केला. Gau protection Maharashtra
तीन महत्त्वाचे प्रश्न
भाकड गाई व वृद्ध गोवंशासाठी शासकीय जमिनींवर स्वतंत्र कुरणे विकसित करण्यासाठी कालबद्ध व ठोस कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा विचार आहे काय, सन १९६१ मधील व आजच्या जनावरांच्या संख्येच्या तुलनात्मक आकडेवारीच्या आधारे भविष्यातील चारा उपलब्धता व पोषण व्यवस्थेचे नियोजन होणार आहे काय, तसेच वाढती खर्चिक स्थिती व चारा टंचाईमुळे अडचणीत आलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठी गोवंश संगोपनासाठी शासकीय सहाय्य किंवा पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे काय, असे तीन महत्त्वाचे प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केले.
या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांना ‘मागणी’ नव्हे तर ‘उपयुक्त व सकारात्मक सूचना’ असे संबोधले. गोवंश वाचवायचा असेल तर भाकड व वृद्ध जनावरांचे संगोपन आवश्यक असल्याचे मान्य करत, शासकीय जमिनींवर कुरण विकास, पावसाच्या अंदाजानुसार चारा व्यवस्थापन तसेच या विषयावर निश्चित सहकार्य करण्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.भविष्यात या योजना अधिक सक्षम करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले. शेवटी, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या तिन्ही मुद्द्यांवर शासन शंभर टक्के अंमलबजावणी करेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.










