Morwa Airport Road Upgrade : चंद्रपूर, दि.१२ डिसेंबर २०२५ (News३४) -राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून मोरवा ते मोरवा विमानतळ मार्गाच्या सुधारणा व उन्नतीसाठी तब्बल ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतूक सुलभता लक्षात घेता अत्यावश्यक असलेल्या या कामासाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.
मोरवा विमानतळ परिसरात नागपूर उडान क्लबच्या DGCA-अनुमोदित प्रशिक्षण सुविधा कार्यरत आहेत. सुरक्षित आणि आधुनिक विमान संचालनासाठी दर्जेदार रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, विमानतळाच्या आधुनिकीकरणासोबत जोडणाऱ्या मार्गाचे उन्नतीकरण अत्यावश्यक झाले होते. यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे मागणी करत सविस्तर पाठपुरावा केला होता. (हे हि वाचा – १४ वर्षीय मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार)
रस्ता सुधारणा झाल्यानंतर वैमानिक प्रशिक्षण, विमानतळ सेवा, तसेच स्थानिक रहदारी या सर्वांना मोठा दिलासा मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्याच्या विमानतळ विकासाला नवी गती मिळणार आहे. Morwa Airport Road Upgrade
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, मोरवा विमानतळाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून चंद्रपूरच्या भविष्यातील प्रगतीचा कणा आहे. विमानतळाशी जोडणारा मार्ग सुरक्षित, मजबूत आणि दर्जेदार झाल्यावर प्रशिक्षण संस्था, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या संधींना व्यापक चालना मिळेल. चंद्रपूरला आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावे आणि येथील तरुणांना हवाई सेवा क्षेत्रात नवी दारे खुली व्हावीत, हे माझे सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.










