तळोधी टीचर कॉलनीत भामट्यांची चलाखी; वृद्ध महिलेचे 31 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

तळोधी: Talodhi Gold Fraud प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी परिसरात खळबळ उडाली आहे. भांडी आणि दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात भामट्यांनी 66 वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून 31,350 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना ब्रम्हपुरी उपविभागातील तळोधी पोलीस हद्दीत घडली आहे. (कामाचा मोबदला दे म्हणून मागितली ५ हजाराची लाच)

चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टिचर कॉलनी परिसरात एका धक्कादायक भामटेगिरीची घटना उघडकीस आली आहे. भांडी आणि दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात भामट्यांनी एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून सोन्याचे दागिने असा एकूण ३१ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी तळोधी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरात या घटनेमुळे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Talodhi Gold Fraud ने परिसरात खळबळ

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तळोधी येथील टीचर कॉलनी (गजानन महाराज मंदिराजवळ) येथे राहणाऱ्या सौ. संगिता प्रशांत वैरागडे (वय ४६, व्यवसाय शिक्षिका) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार संगिता वैरागडे या सावरगाव येथील लोक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असून, घरात त्यांचा ११ वर्षांचा मुलगा श्रियांश आणि ६६ वर्षीय आई ललिता लहु ढोके एकत्र राहतात. बुधवार, ३ जून २०२६ रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास संगिता वैरागडे या त्यांच्या एम.एस्सी. (M.Sc.) च्या पेपरसाठी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरी केवळ त्यांचे लहान मूल आणि वृद्ध आई ललिता हे दोघेच उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास गळ्यामध्ये आयकार्ड (Identity Card) घातलेले दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरी आले. ते दोन्ही इसम हिंदी भाषेत बोलत होते. त्यांनी ललिता ढोके यांना सांगितले की, आम्ही मार्केटिंग करणारे असून तांब्याची आणि पितळेची भांडी स्वच्छ व चमकावण्याचा पावडर विकत आहोत, असे म्हणून त्यांनी आपल्या पिशवीतून पावडरचा डबा काढून दाखवला. सुरुवातीला वृद्ध महिलेने नकार दिला, मात्र भामट्यांनी आग्रह धरून तांब्याचे भांडे आणण्यास सांगितले आणि ते पावडराने साफ करून चमकवून दाखवले.

त्यानंतर त्यांनी पायातील चांदीचे जोडवे मागून तेही स्वच्छ करून दिले, ज्यामुळे वृद्ध महिलेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला. हाच विश्वास संपादन करून भामट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याची ऑफर दिली. ललिता यांनी दागिने नसल्याचे सांगितले असता, भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत मागितली. विश्वासापोटी त्यांनी गळ्यातील सोन्याची पोत काढून चोरांच्या स्वाधीन केली.

त्यानंतर भामट्यांनी त्यांना घरातून हळद आणण्यास सांगितले. ललिता हळद आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता, चोरांनी आपल्या पिशवीतून स्टीलचा एक चापट डबा काढला. त्यात हळद, पाणी आणि सोन्याची पोत टाकली. तेवढ्यात डब्यात हळद-पाणी जास्त झाल्याचे निमित्त साधून चोरांनी कानातील सोन्याच्या दोन बिऱ्या सुध्दा साफ करण्यासाठी मागून घेतल्या आणि त्याही डब्यात टाकून डब्याचे झाकण बंद केले. यानंतर दोन्ही आरोपींनी घरात स्वयंपाक खोलीत जाऊन गॅस सुरू केला आणि तो डबा गॅसच्या आचेवर ठेवला.

त्यांनी ललिता यांना सक्त ताकीद दिली की, हा डबा पुढील १० मिनिटे उघडू नका, आम्ही १० मिनिटांनंतर हा डबा परत घ्यायला येतो, असे सांगून दोघेही तिथून पसार झाले. ललिता यांनी १० मिनिटे वाट पाहिली, मात्र ते परत न आल्याने त्यांनी संशयावरून गॅस बंद करून तो स्टीलचा डबा उघडून पाहिला. डबा उघडताच त्यांना आतमध्ये सोन्याची पोत किंवा कानातील बिऱ्या काहीच मिळून आले नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.

दुपारी ३:०० वाजता संगिता वैरागडे पेपर देऊन घरी परत आल्यावर त्यांच्या आईने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यांनी शेजारील लोकांकडे त्या दोन भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच सुगावा लागला नाही. भामट्यांनी ११,००० रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (ज्यामध्ये सोन्याचे दोन डोर्ले होते), ५,५०० रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे पोतीत ओवलेले २० सोन्याचे मणी, आणि १४,८५० रुपये किमतीच्या २.७ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या दोन बिऱ्या, असा एकूण ३१,३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

या धक्कादायक घटनेमुळे वृद्ध आईची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. आईच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर संगिता वैरागडे यांनी काल, १० जून रोजी तळोधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही नोंद पोलीस उपनिरीक्षक राहुल सुरेश गुहे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गुणवंतराव लांबट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
📢 Follow NEWS34 WhatsApp Channel
ताज्या ब्रेकिंग बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी बातम्या आणि स्थानिक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी NEWS34 WhatsApp Channel Follow करा.

Leave a Comment