Gadchandur Gas Scam गॅस सिलिंडर काळाबाजार तपासणी दृश्य

गडचांदूर गॅस एजन्सीत घोटाळा: शासकीय सिलिंडर्सचा काळाबाजार उघड, गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 13, 2026

गडचांदूर: Gadchandur Gas Scam प्रकरणात गडचांदूर येथील मेताशा इंडेन गॅस एजन्सीमध्ये शासकीय सिलिंडर्सचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार उघड झाला आहे. कोरपना तहसील कार्यालयाच्या अचानक तपासणीत स्टॉकमध्ये गंभीर तफावत आढळून आली. ऑनलाईन रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठा फरक दिसल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली. या प्रकरणामुळे गॅस वितरण व्यवस्थेतील गंभीर अनियमितता समोर आली असून पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

येथील मेताशा इंडेन गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांच्या हक्काच्या शासकीय गॅस सिलिंडर्सचा मोठ्या प्रमाणावर अपहार आणि काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर अनियमिततेप्रकरणी कोरपना तहसील कार्यालयाच्या निरीक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गडचांदूर पोलीस ठाण्यात एजन्सीच्या चालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (बनावट तंबाखूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा)

Gadchandur Gas Scam प्रकरणाचा संपूर्ण तपास

गडचांदूर येथील मेताशा इंडेन गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाकडून गॅस सिलिंडर वितरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व अनियमितता केली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्राहकांकडून प्रशासनाकडे वारंवार प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कोरपना तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गॅस एजन्सीचे कार्यालय आणि गोदामाची अचानक व आकस्मिक तपासणी करण्यात आली.

रात्रीच्या वेळी एजन्सी बंद असल्याने अधिकृत पंचसमक्ष संबंधित कार्यालय व गोदाम तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार संजय भगत, पुरवठा निरीक्षक मिलिंद कांबळे, ग्राम महसूल अधिकारी सतीश मिटकारी, मंडळ अधिकारी निरंजन गोरे आणि कनिष्ठ लिपिक प्रकाश माथनकर या सर्व अधिकृत शासकीय साक्षीदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सील उघडून कार्यालय व गोदामातील साठ्याची पडताळणी करण्यात आली.

या साठा पडताळणीदरम्यान गॅस एजन्सीचा ऑनलाईन नोंदणीकृत स्टॉक आणि प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध असलेला गॅस सिलिंडरचा साठा यामध्ये अत्यंत गंभीर आणि विस्मयकारक तफावत आढळून आली. ऑनलाईन रेकॉर्डनुसार गोदामात १४.२ किलोग्रॅम वजनाचे ६०५ भरलेले गॅस सिलिंडर्स असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष तपासणीत केवळ २५८ सिलिंडर्स मिळून आले, म्हणजेच तब्बल ३४७ भरलेले सिलिंडर्स कमी आढळले. याउलट, १४.२ किलोग्रॅम वजनाचे केवळ ६३ रिकामे सिलिंडर्स अपेक्षित असताना प्रत्यक्ष जागेवर ३७९ रिकामे सिलिंडर्स आढळून आले, जे नियमापेक्षा ३१६ ने अतिरिक्त होते.

तसेच ५ किलोग्रॅम वजनाच्या रिकाम्या सिलिंडर्सची नोंद १० असताना प्रत्यक्ष ४९ सिलिंडर्स आढळले, तर १० किलोग्रॅम वजनाचे ३६ भरलेले सिलिंडर्स रेकॉर्डवर दाखवले असताना गोदामात एकही सिलिंडर मिळून आला नाही. याशिवाय १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक भरलेल्या सिलिंडर्समध्येही २९ सिलिंडर्सची घट आढळून आली. इतकेच नव्हे तर, गॅस एजन्सीच्या कार्यालयात इंडेन व इतर कंपन्यांचे एकूण ३९ गॅस सिलिंडर्स पूर्णपणे अनधिकृत व बेकायदेशीररी्या साठवून ठेवल्याचेही समोर आले.

शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन करून ग्राहकांच्या हक्काच्या गॅस सिलिंडर्सची काळ्या बाजारात विक्री करण्यात आल्याचे या मोठ्या साठा तफावतीवरून स्पष्ट झाले आहे. हे कृत्य केंद्र सरकारचा द्रवीकृत पेट्रोलियम गॅस पुरवठा आणि वितरण आदेश २००० मधील कायदेशीर तरतुदींचे तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ चे थेट व गंभीर उल्लंघन ठरणारे आहे. या संपूर्ण प्रकरणी चंद्रपूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर तहसीलदार कोरपना यांनी दिलेल्या आदेशान्वये निरीक्षण अधिकारी विको देवराव देवघरे यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी सौ. प्रज्ञा उज्ज्वल रामटेके (चालक, मेताशा गॅस एजन्सी) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला असून पोलीस निरीक्षक शिवाजी भीमराव कदम यांच्या मार्गदर्शनात पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment