तळोधी (बाळापूर): Nagbhid Wildlife Conflict पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापूर) जवळील गिरगाव जंगल परिसरात 52 वर्षीय गुराखी आत्माराम दसरू बोरकर यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या वर्षातील हा 21 वा बळी ठरला आहे. घटनेनंतर वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र आणि चिंताजनक बनत चालला आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) जवळील गिरगाव जंगल परिक्षेत्रात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ५२ वर्षीय गुराख्यावर वाघाने झडप घालून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले असून, चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा २१ वा बळी ठरला आहे. आत्माराम दसरू बोरकर (वय ५२ वर्षे, रा. गिरगाव, ता. नागभीड) असे मृत गुराख्याचे नाव आहे. (वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार)
Nagbhid Wildlife Conflict मध्ये आणखी एक बळी
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम बोरकर हे नेहमीप्रमाणे १८ जून रोजी दुपारच्या सुमारास गिरगाव जंगल परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. संध्याकाळच्या सुमारास सर्व शेळ्या सुखरूप घरी परतल्या, मात्र आत्माराम घरी आले नाहीत. घरच्यांनी शेळ्यांची पाहणी केली असता, कळपातील एक शेळी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. (वाघाच्या हल्ल्यात ४ महिला ठार)
कदाचित ती चुकलेली शेळी शोधण्यासाठीच आत्माराम पुन्हा जंगलात गेले असावेत, असा अंदाज कुटुंबीयांनी वर्तवला. मात्र, उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
रात्रभर शोधमोहीम, सकाळी आढळला छिन्नविच्छिन्न मृतदेह
आत्माराम घरी न आल्याने काळजीत पडलेल्या गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी रात्रीच जंगलात धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, घनदाट अंधारामुळे रात्री त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. या घटनेची माहिती तातडीने वन विभाग आणि स्थानिक पोलिसांना देण्यात आली.
आज, १९ जून रोजी सकाळी वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. गिरगाव बीटमधील गोविंदपूर राउंड अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ५३५ मध्ये आत्माराम यांचा वाघाच्या हल्ल्यात छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह आढळून आला. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते.
वन विभाग व पोलिसांची पुढील कारवाई
घटनास्थळी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
तपास अधिकारी:
या घटनेचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) ए. आर. कन्नमवार आणि तळोधीचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पोलीस पथक करीत आहे.
परिसरात दहशतीचे सावट; मदतीची मागणी
या वर्षात वाघाच्या हल्ल्यात तब्बल २१ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये वन विभागाच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. गिरगाव आणि तळोधी परिसरात सध्या प्रचंड दहशत पसरली असून, वन्यजीवांचा बंदोबस्त करावा आणि मृतकाच्या कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






