चंद्रपूर – Ballarpur SRPF Camp संदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बंद पडलेल्या पॉवर हाऊसची जागा राज्य राखीव पोलीस बलासाठी उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली. सुमारे ४५ एकर जागेवर कवायत मैदान, निवासस्थाने, शस्त्रागार, रुग्णालय, जिम्नॅशियम आणि नक्षलविरोधी मोहिमांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. (चंद्रपूर लोकसभा खासदाराचे रिपोर्ट कार्ड बघितले का?)
बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथे बंद पडलेल्या पॉवर हाऊसची जागा राज्य राखीव पोलीस बलासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्रालयात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. लोकेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, नागपूरचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट श्री. जगताप तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ballarpur SRPF Camp संदर्भातील मंत्रालयातील बैठक
बैठकीत मौजा विसापूर, ता. बल्लारपूर येथील बंद पडलेल्या पॉवर हाऊसची सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमीन दीर्घकाळापासून वापरात नसून निर्जन अवस्थेत असल्याची बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिली. . ही जागा भौगोलिकदृष्ट्या तसेच स्थानिक सुविधांच्या दृष्टीने राज्य राखीव पोलीस बलासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या जागेपैकी ४५ एकर जमीन राज्य राखीव पोलीस बलासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडता यावी, तसेच नक्षलविरोधी मोहिमांना बळ मिळावे, यासाठी ही जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रस्तावित जागेवर राज्य राखीव पोलीस दलाचे कवायत मैदान, शासकीय निवासस्थाने, पोलीस अधिकारी विश्रामगृह, समादेशक कार्यालय, गटभंडार, शस्त्रागार, बॅचलर बॅरक, मेस, मोटार परिवहन विभाग, क्रीडांगण, दरबार हॉल, रुग्णालय, उपहारगृह, शाळा, नक्षल अभियान डेमो मैदान, जिम्नॅशियम, नक्षल बंदोबस्तासाठी तीन कंपन्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, मनोरंजन हॉल आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
बैठकीत अपर मुख्य सचिव श्री. लोकेशचंद्र यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रस्तावासंदर्भातील आवश्यक अनुषंगिक प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या सकारात्मक निर्णयाबद्दल अपर मुख्य सचिव श्री. लोकेशचंद्र यांचे आभार व्यक्त केले. विसापूर येथे राज्य राखीव बलाचा तळ उभारला गेल्यास चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असून रोजगार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






