चंद्रपूर : (Pratibha Dhanorkar Exam Scam) चंद्रपूरमध्ये परीक्षा घोटाळ्याविरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट परीक्षा व्यवस्थेचा संसदेत पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.
ग्रामीण भागातील गरीब शेतकरी व कष्टकरी पालकांचे आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न या भ्रष्ट व्यवस्थेने आणि परीक्षा माफियांनी धुळीस मिळवले आहे. दिवस-रात्र एक करून ७००-७०० मार्क मिळवणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या हक्कावर हा मोठा दरोडा आहे. मी तुमच्या कुटुंबातील एक मोठी बहीण आणि आई म्हणून माझ्या मुलांवर चाललेला हा अन्याय अजिबात सहन करणार नाही. आगामी संसद अधिवेशन सुरू होताच, या भ्रष्ट परीक्षा पद्धतीचा पर्दाफाश करून केंद्र सरकारला संसदेत जाब विचारल्याशिवाय आणि दोषींना कडक शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा घणाघाती इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित ‘छात्रों की गूंज – युवांच्या समस्यांचे संमेलन’ या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. (२८ जूनला चंद्रपुरात महामोर्चा)
यावेळी माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, काँग्रेस जेष्ठ नेते विनायक बागडे, प्रा. दिलीप चौधरी, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेस नेते बंडूभाऊ धोत्रे, काँग्रेस नेते सुभाष गौर, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, प्रोफेशनल काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष मनीष तिवारी, नगरसेवक सचिन कत्याल, संतनू धोटे, रमीज शेख, स्वप्नील कांबळे, राज यादव, नरेश मुधाडा, नगरसेवक अभिषेक दोईफोडे, यश दत्तात्रेय यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pratibha Dhanorkar Exam Scam : संसदेत सरकारला जाब विचारणार
पुढे बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, परीक्षेतील गोंधळ आणि नैराश्यामुळे देशभरात नागपूरची एक मुलगी, उत्तर प्रदेशातील ऋतिक मिश्रा आणि राजस्थान-बेंगळुरू तसेच देशातील १७ वर्षीय विद्यार्थिनीसह जवळपास १२ ते १४ निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये “आता पुन्हा परीक्षा देण्याची ताकद उरलेली नाही” असे लिहून या व्यवस्थेच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांचा एवढा मानसिक छळ करणारी ही परीक्षा पद्धत आहे की त्यांना मृत्यूच्या दारात ढकलणारी जुलमी राजवट, याचा जाब आता सरकारला द्यावाच लागेल, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
या घोटाळ्याच्या चौकशीबद्दल बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात एनटीए नियुक्त शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मंढारे आणि मनीषा हवालदार यांना दोषी मानले आहे. आमच्या मुलांच्या भविष्याचा सौदा करणाऱ्या अशा गुन्हेगारांना शिक्षण क्षेत्रात जागा मिळता कामा नये. या महाघोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत लातूरच्या शिक्षकांपासून ते देशातील वेगवेगळ्या राज्यांतून एकूण १३ जणांना अटक केली असून, परीक्षा माफियांचे हे जाळे मुळासकट उपटून टाकणे गरजेचे आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचा उल्लेख करत खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, राहुल गांधींनी राजस्थानच्या कोटा येथे ‘छात्रों की गूंज’ मेळावा घेऊन सुमारे ४००० विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधला व त्यांची वेदना देशासमोर मांडली. राहुलजींनी म्हटल्याप्रमाणे, आजची शिक्षण व्यवस्था ही हुशार विद्यार्थ्यांना निवडणारी ‘सेलेक्शन सिस्टीम’ राहिलेली नसून, मुलांचे भविष्य नाकारणारी ‘रिजेक्शन सिस्टीम’ बनली आहे. कोटा येथून सुरू झालेली ही मोहीम पुढे नेत, चंद्रपूरची खासदार म्हणून मी या चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आणि पेपरफुटी, बेरोजगारी तसेच नोकरभरतीतील विलंबाविरोधात विद्यार्थ्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत खंबीरपणे उभी राहीन आणि आपण हा लढा नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






