Chandrapur Police Rescue तरुणाला वाचवताना

चंद्रपूर पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचा जीव वाचला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 28, 2026

चंद्रपूर: Chandrapur Police Rescue मध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले. सावली पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणाने व्हिडिओ कॉलवर विषारी बाटली दाखवली. चंद्रपूर सायबर पोलिस आणि भद्रावती पोलिसांच्या समन्वयातून अवघ्या १० मिनिटांत तरुणाला शोधून काढले. (चंद्रपुरातील अख्ख कुटुंब समृद्धी महामार्गावर संपलं)

जिल्हा पोलिसांच्या अत्यंत तत्पर, सतर्क आणि गतिमान कामगिरीमुळे एका ३२ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि विविध पोलीस ठाण्यांमधील उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन घडवत चंद्रपूर पोलिसांनी आत्महत्येचा टोकाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वेळेत ताब्यात घेतले. त्याचे योग्य समुपदेशन करून त्याला सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याने पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक होत असून, नातेवाईकांनी पोलिसांचे अत्यंत भावूक होत आभार मानले आहेत.

Chandrapur Police Rescue : ३२ वर्षीय तरुणाचा जीव वाचवला

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक २८ जून २०२६ रोजी पोलीस स्टेशन सावली हद्दीतून एक ३२ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता (मिसिंग) झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात, सदर तरुणाने सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास आपल्या हातामध्ये रासायनिक द्रव्याची (विषारी औषध) बाटली घेऊन थेट आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल केला. “मी आत्महत्या करत आहे,” असे सांगून त्याने तात्काळ कॉल कट केला. या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड घाबरट निर्माण झाली आणि त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता तातडीने सावली पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. (आईस्क्रीमचे आमिष दाखवीत ५ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न)

घटनेचे गांभीर्य आणि वेळेचे महत्त्व ओळखून सावली पोलिसांनी तातडीने चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युद्धपातळीवर तपास सुरू करून सदर इसमाचे अचूक लोकेशन शोधून काढले. तपासात तो तरुण भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांना त्वरित सतर्क करण्यात आले. माहिती मिळाल्यापासून अवघ्या १० मिनिटांच्या आत भद्रावती पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत तत्परतेने शोध मोहीम राबवून त्या तरुणाला शोधून काढले आणि अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याचे योग्य प्रकारे समुपदेशन (Counselling) केले. पोलिसांच्या समंजस भूमिकेमुळे आणि समुपदेशनामुळे त्याचे मनपरिवर्तन झाले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. चंद्रपूर पोलिसांच्या या देवदूतासारख्या कामगिरीमुळे आपल्या मुलाचा जीव वाचल्याने नातेवाईकांचे डोळे पाणावले होते.

सदर कौतुकास्पद व जीवरक्षक कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सावली प्रदीप पुल्लरवार यांच्या नेतृत्वात सपोनि सचिन मुसळे, पोहवा संजय शुक्ला, पोअं धिरज पिदुरकर, धनंजय काळे (पोलीस स्टेशन सावली) आणि सपोनि श्री. वीरेंद्र केदारे, श्री. संजय मिश्रा, पोउपनि श्री. संतोष केदार, पोहवा गोपाल आतकुलवार, पोअं योगेश घाटोळे, भारत पुसांडे, खुशाल, किरण मिस्त्री (पोलीस स्टेशन भद्रावती) आणि सपोनि श्री. बळराम झाडोकर, पोअं वैभव पट्टीवार (सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

एक नम्र आवाहन: जीवन हे अत्यंत अमूल्य आणि सुंदर आहे. कोणत्याही कौटुंबिक, आर्थिक किंवा मानसिक समस्येवर आत्महत्या हा कधीही पर्याय असू शकत नाही. अपयश किंवा नैराश्याच्या क्षणी टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी आपल्या मित्रपरिवाराशी, नातेवाईकांशी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांशी मनमोकळेपणाने संवाद साधावा. प्रत्येक समस्येवर मार्ग निघू शकतो, त्यामुळे संयम राखा आणि कोणत्याही परिस्थितीत असे कृत्य करून आपले कुटुंब उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment