चंद्रपूर – (Tadoba Tiger Attack) मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची दुर्दैवी घटना घडली आहे. चोरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात केळझर येथील ३१ वर्षीय संजय माधवराव सिडाम यांचा मृत्यू झाला. शेतात सौरऊर्जेचे कुंपण बसविताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. (नागभीड तालुक्यातील गिरगावात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार)
ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या चोरगाव परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून, वाघाच्या हल्ल्यात एका ३१ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. संजय माधवराव सिडाम (मूल रा. केळझर,) असे मृत तरुणाचे नाव असून, या भागातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा २२ वा बळी ठरला आहे.
Tadoba Tiger Attack : चोरगावात नेमके काय घडले?
संजय हा मागील काही महिन्यांपासून चोरगाव येथे आपल्या सासऱ्याच्या शेतीची कामे करत होता. हे शेत ताडोबा बफर जंगलाला लागून असल्याने तिथे वन्यप्राण्यांचा मोठा वावर असतो. चार दिवसांपूर्वीच त्याने शेतात कपाशीची लागवड केली होती आणि वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी रविवारी (दि. २८) दुपारी १ वाजेच्या सुमारास तो पत्नी, सासू व सासऱ्यासोबत शेताभोवती सौरऊर्जेचे कुंपण लावण्याचे काम करत होता.
कुंपणासाठी शेताच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडत असताना, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक संजयवर पाठीमागून भीषण हल्ला केला. हा थरार जवळच असलेल्या त्याच्या सासऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता हातात काठी घेऊन वाघाला पळवून लावण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, वाघाने दिलेल्या एका भयानक डरकाळीमुळे सासरे जागच्या जागीच सुन्न झाले आणि त्यांची पाचावर धारण बसली. तोपर्यंत वाघाने संजयचा गळा आवळून त्याला जागीच ठार केले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागातर्फे मृत संजयच्या कुटुंबीयांना तातडीची ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत सुपुर्द करण्यात आली आहे. तसेच नियमानुसार उर्वरित २५ लाख रुपयांची आर्थिक मदतही लवकरच मिळवून दिली जाईल, अशी माहिती ताडोबा बफरचे उपसंचालक विशाल माळी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका येलमे यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






