Chandrapur Tiger News : मूल तालुक्यात मृतावस्थेत आढळलेला नर वाघ आणि वनविभागाची तपासणी

वाघाच्या मृत्यूचे सत्र सुरूचं, मूल तालुक्यात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 30, 2026

चंद्रपूर: (Chandrapur Tiger News) चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका नर वाघाचा मृतदेह आढळल्याने वनवर्तुळात चिंता वाढली आहे. मूल तालुक्यातील चिकली चक क्र. २ येथील शेतशिवारात ६ ते ७ वर्षांच्या वाघाचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासणीत शिकारीचे कोणतेही स्पष्ट पुरावे आढळले नाहीत. शवविच्छेदन पूर्ण झाले असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात १० हून अधिक वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीव संवर्धनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. (शेतात कुंपण तार लावत असताना वाघाचा हल्ला)

चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीवांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून, गेल्या अवघ्या ६ महिन्यांत १० पेक्षा जास्त वाघांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. यातच आता चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूल तालुक्यातील चिकली चक क्र. २ येथील बिगर वनक्षेत्रात एका नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ३० जून २०२६ रोजी दुपारी १:०० वाजताच्या सुमारास चिकली चक क्र. २ मधील सर्व्हे नंबर ७८ (बिट: चितेगाव, राऊंड: राजोली) येथील शेतशिवारात हा मृतदेह नागरिकांच्या आणि वनविभागाच्या निदर्शनास आला. मृत पावलेला वाघ नर जातीचा असून त्याचे वय साधारण ६ ते ७ वर्षे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वाघाचा मृत्यू साधारणपणे एक दिवस आधी झाला असावा, असा प्राथमिक कयास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Chandrapur Tiger News : मूलमध्ये नर वाघाचा मृतदेह कसा आढळला?

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वन्यजीव संस्थांचे प्रतिनिधी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. यामध्ये चंद्रपूरचे सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, डब्ल्यूपीएसआय (WPSI) चे प्रतिनिधी मुकेश भांदककर, इको प्रो संघटनेचे राजू काहीलकर आणि चंद्रपूर वनविभागाचे बायोलॉजिस्ट अक्षय नारनवरे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नियमावलीनुसार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. सुदैवाने, प्राथमिक तपासणी दरम्यान मृत वाघाचे सर्व अवयव जसेच्या तसे आणि सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे शिकारीची शक्यता तूर्तास तरी फेटाळली जात आहे.

यानंतर राजोली रोपवाटिकेत या वाघाचे शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले. शवविच्छेदनासाठी मूल तालुका पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विलास गाखरे, टीटीसी चंद्रपूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार आणि बोथली (ता. सावली) येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. आकाश गोमकाळे हे पशूवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी वाघाच्या मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वनविभागाने मृत वाघाचे विजातीय नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, सावलीचे परिक्षेत्र वन अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात अवघ्या ६ महिन्यांतच १० हून अधिक वाघांना गमवावे लागल्याने वन्यजीवप्रेमींमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment