Chandrapur Baby Selling Case संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी

बाळ विक्री प्रकरणी आमदार जोरगेवार गप्प का? प्रतिमा ठाकूर यांचा सवाल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 2, 2026

चंद्रपूर : (Chandrapur Baby Selling Case) चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. आरोपी महिलांचे सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) ने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणात निष्पक्ष तपास, आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (नवजात बाळ विक्री प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना अटक)

शहरात नवजात बालकांच्या अवैध विक्रीचे एक धक्कादायक रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणात रामनगर पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला आरोपी स्थानिक आमदारांच्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून परिचीत असल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण लागताना दिसत आहे. या संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अत्यंत निष्पक्षपणे या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Chandrapur Baby Selling Case मध्ये शिवसेनेची मोठी मागणी

याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना (एकनाथ शिंदे) चंद्रपूरच्या वतीने एका विशेष शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शिवसेनेचे पक्ष सचिव मनीषा कायंदे, लोकसभा संपर्क प्रमुख कृपाल तुमाने आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पोलीस प्रशासनाला भेटले. या निवेदनात प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे की, आरोपी महिलांचे सत्ताधारी पक्षाशी थेट लागेबांधे असल्याने या चौकशीत कोणताही हस्तक्षेप होऊ नये.

तसेच, या महिलांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची आणि बेकायदेशीरपणे जमवलेल्या संपत्तीचीही सखोल चौकशी करण्यात यावी. नवजात बालकांच्या तस्करीसारखा अमानुष गुन्हा करणाऱ्या या आरोपींना कायद्यानुसार कठोरतम शिक्षा होईल, याची पूर्ण दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन दिल्यावर प्रतिमा ठाकूर म्हणाल्या कि सदर महिला आमदार जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक आहे, दोघांना अटक झाल्यावर सुद्धा आमदार जोरगेवार हे गप्प का आहे असा प्रश्न ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला.

चंद्रपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात बाळ विक्री प्रकरणी राजकीय सहभागाची चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना शिवसेना महानगरप्रमुख भरत गुप्ता, उपजिल्हाप्रमुख माया मेश्राम, तालुका प्रमुख अंजू लेनगुरे, विधानसभा प्रमुख सीमा रामेडवार, प्रियंका गुप्ता, शीतल ढाले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत रुजलेली आहेत आणि यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याकडे आता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment