राजुरा/विरूर: (Rajura Family Murder) राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने परिसर हादरला आहे. दारूच्या नशेत वृद्ध माता-पित्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा त्याच्याच चुलत भावाने बांबूच्या दांड्याने वार करून खून केल्याचा आरोप आहे. विरूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास सुरू आहे. (आधी लिफ्ट मागायची आणि वेळ मिळताच वाहन चोरी)
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथे गुरुवार, २ जुलैच्या रात्री कौटुंबिक वादातून एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. दारूच्या नशेत स्वतःच्या वृद्ध माता-पिताला बेदम मारहाण करून कुऱ्हाडीने जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३८ वर्षीय नराधम पुतण्याचा त्याच्याच चुलत भावाने संतापाच्या भरात बांबूच्या दांड्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण विहीरगाव परिसरात प्रचंड दहशत आणि खळबळ माजली आहे. रवींद्र शंकर गुरमेत्तीवार (वय ३८) असे मृत युवकाचे नाव असून, विरूर पोलिसांनी आरोपी चुलत भाऊ नितीन गजानन गुरमेत्तीवार (वय ३४) याला बेड्या ठोकल्या आहेत.
Rajura Family Murder प्रकरणात नेमके काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, मृतक रवींद्र गुरमेत्तीवार हा दारूच्या आहारी गेला होता. गुरुवारी रात्री तो नेहमीप्रमाणे प्रचंड दारू पिऊन घरात आला आणि आपली आई अनिता गुरमेत्तीवार व वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालू लागला. वाद इतका वाढला की, त्याने वृद्ध माता-पिताला अमानुषपणे शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता रवींद्रने घरातील कुऱ्हाड काढून थेट स्वतःच्या जन्मदात्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलाचे हे हिंस्त्र रूप पाहून वृद्ध माता-पिता जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पळाले.
या भयानक परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या आई अनिता गुरमेत्तीवार यांनी तात्काळ गावाचे पोलीस पाटील सचिन राजेश्वर बोठे यांच्याशी संपर्क साधून घरात सुरू असलेल्या थराराची माहिती दिली. पोलीस पाटलांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मृतक रवींद्रचा चुलत भाऊ नितीन गुरमेत्तीवार याला फोन केला आणि काका-काकूंच्या मदतीसाठी जाण्यास सांगितले. (सोलर कनेक्शन मीटर जोडण्यासाठी मागितले ३ हजार, महावितरणच्या उप अभियंत्याला अटक)
यानंतर काही वेळातच, म्हणजेच रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास, नितीन गुरमेत्तीवार याने स्वतः पोलीस पाटील सचिन बोठे यांना फोन केला आणि “मी रवींद्रला मारून टाकले आहे, तो मला आणि माझ्या काका-काकूंना खूप दिवसांपासून त्रास देत होता,” अशी धक्कादायक कबुली दिली. ही माहिती मिळताच पोलीस पाटील अत्यंत वेगाने घटनास्थळाकडे रवाना झाले. ते तिथे पोहोचले असता, आरोपी नितीन गजानन गुरमेत्तीवार हातात रक्ताने माखलेला बांबूचा दांडा घेऊन उभा होता. त्याने संतापाच्या भरात याच दांड्याने रवींद्रच्या डोक्यावर ३ ते ४ जोरदार वार करून त्याचा गेम वाजवल्याची कबुली पोलीस पाटलांसमोर दिली.
घरासमोरील अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बांबूच्या जबर फटक्यांमुळे त्याच्या डोक्याला आणि उजव्या कानाला गंभीर दुखापत झाली होती व कानातून रक्ताची धार वाहत होती. डोक्याच्या मागच्या भागावरही खोल जखमांच्या खुणा दिसत होत्या. घटना घडली तेव्हा परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता, तरीही पडणाऱ्या पावसातही संपूर्ण घटनास्थळ रक्ताने लाल झाले होते. या थरारक घटनेची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड आपल्या पोलीस फौजफाट्यासह तात्काळ विहीरगाव येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
याप्रकरणी विहीरगावचे पोलीस पाटील सचिन बोठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चुलत भाऊ नितीन गजानन गुरमेत्तीवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या सखोल गुन्ह्याची आणि कौटुंबिक वादामागच्या कारणांची पुढील चौकशी विरूर पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी राजेंद्र गायकवाड करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






