भद्रावती/चंद्रपूर: (Bhadrawati CA Foundation AIR 2) भद्रावतीच्या अयान अब्बास अली अजानी याने CA Foundation परीक्षा २०२६ मध्ये देशभरातून दुसरा क्रमांक मिळवत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. विशेष म्हणजे त्याने कोणत्याही कोचिंगशिवाय केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ९१.७५ टक्के गुण मिळवले. त्याच्या या यशामुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आता तो CA Inter च्या तयारीला लागला आहे. (चंद्रपुरात ६०० कोटीची टायगर सफारी)
Bhadrawati CA Foundation AIR 2 नंतर CA Inter ची तयारी सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवासी अयान अब्बास अली अजानी याने ‘सीए फाउंडेशन’ (CA Foundation) परीक्षा २०२६ मध्ये संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक (All India Rank 2) पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अयानचा शैक्षणिक प्रवास सुरुवातीपासूनच अत्यंत सुवर्णमयी आणि कौतुकास्पद राहिला आहे. त्याने यापूर्वी १० वीच्या परीक्षेत ९८.६% तर सीबीएसई (CBSE) १२ वीच्या परीक्षेत ९९.८% गुण मिळवून आपले गुणवत्तेचे सातत्य सिद्ध केले होते. आता ‘सीए फाउंडेशन’ सारख्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत ९१.७५% गुण मिळवून देशभरातून दुसरा येण्याचा ऐतिहासिक बहुमान त्याने आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवला आहे.
आपल्या या यशाबद्दल बोलताना अयानने सांगितले की, त्याने हे यश कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय, केवळ ‘सेल्फ स्टडी’ (स्वतः अभ्यास) आणि आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मिळवले आहे. घरातच राहून अत्यंत नियोजनबद्ध व नियमित अभ्यास आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन यांमुळेच आपण या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचू शकलो, अशी भावना त्याने व्यक्त केली.
अयानच्या या दैदिप्यमान यशामुळे भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिक्षकांनी अयानच्या चिकाटीचे, कठोर परिश्रमाचे आणि शिस्तीचे भरभरून कौतुक केले आहे. या घवघवीत यशानंतर अयान आता ‘सीए इंटर’च्या (CA Inter) तयारीला लागला असून, भविष्यात एक उत्तम चार्टर्ड अकाउंटेंट बनून देशाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






