Chandrapur Bike Theft Case

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश, ४.३० लाखांच्या ९ गाड्यांसह दोघे अटके

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 8, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातून (Chandrapur Bike Theft Case) एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. स्थानिक सरकारी दवाखान्यातून दुचाकी चोरीला गेल्यानंतर शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पारधीगुडा आणि वणी येथील दोन सराईत संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ९ लोकप्रिय दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यामुळे वाहन चोरट्यांच्या गोटात मोठी घबराट पसरली आहे. (भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल)

स्थानिक सरकारी दवाखान्यासमोरील पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून एका आंतरराज्यीय कुख्यात वाहन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४ जुलै २०२६ रोजी सरकारी दवाखान्याबाहेरून एक स्प्लेंडर मोटार सायकल (क्र. MH 34 BT 1880) चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Chandrapur Bike Theft Case : सरकारी रुग्णालयातून सुरू झाला पोलीस तपास

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना शहर पोलिसांचे डी.बी. पथक पेट्रोलिंगवर होते. त्याच दरम्यान मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रदीप संजय शेरकुरे (वय २९ वर्ष, रा. पारधीगुडा, धोपटाला, ता. कोरपणा) आणि आशिक इब्राहिम शेख (वय ३४ वर्ष, रा. कुरई, ता. वणी, जि. यवतमाळ) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या आंतरराज्यीय टोळीने रचलेला चोरीचा मोठा कट उघडकीस आला.

पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईत आरोपींकडून एकूण ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख ३० हजार रुपये आहे. जप्त वाहनांमध्ये हिरो पॅशन, होंडा सीबी शाईन, स्प्लेंडर प्रो, स्प्लेंडर प्लस, होंडा एसपी १२५ आणि बजाज सीटी १०० अशा लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे. पोलीस तपासात आरोपींनी एकूण ११ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यापैकी दोन गाड्या यापूर्वीच शिरपूर (जि. यवतमाळ) पोलीस आणि एक्साईज विभाग कोरपणा यांच्याकडून जप्त (डिटेन) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे चोरटे चोरीच्या गाड्यांचे मूळ नंबर बदलून त्यावर बनावट नंबर प्लेट लावायचे आणि त्या विकण्याची पूर्ण तयारी करत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

या टोळीने केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे, तर शेजारील यवतमाळ, नागपूर आणि थेट तेलंगणा राज्यातही हात साफ केल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशीदरम्यान या गाड्यांपैकी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २, भारी पोलीस ठाण्यातील १, वणी पोलीस ठाण्यातील १, नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यातील १ आणि एक गाडी थेट तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.

ही मोठी आणि यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, विलास निकोडे आणि त्यांच्या डी.बी. पथकातील अंमलदार सचिन बोरकर, संजय धोटे, कपुरचंद खरकवार, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, रूपेश रणदिवे, भावना रामटेके व सहकाऱ्यांनी अत्यंत चातुर्याने पार पाडली. या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या गोटात तीव्र खळबळ उडाली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment