राजुरा: राजुरा येथून (Rajura POCSO Case) एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका २२ वर्षीय युवकाने १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या धोक्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (ट्र्क चालकावर जीवघेणा गुन्हा दाखल)
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका २२ वर्षीय युवकाने १३ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना राजुरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पालकांसह दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Rajura POCSO Case: फेसबुक मेसेंजरवरील चॅटिंगने ओढवले संकट
राजुरा पोलिसांनी दिलेल्या विस्तृत माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला राजुरा येथील रहिवासी असलेल्या अरबाज चाऊस (वय २२ वर्ष) या युवकाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. निष्पाप मुलीने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये मेसेंजरवर चॅटिंग सुरू झाले. अरबाजने तिला आपल्या गोड बोलण्यात गुंतवून विश्वासात घेतले. यानंतर दिनांक २५ जून २०२६ रोजी आरोपी अरबाजने तिला राजुरा येथे भेटायला बोलावले. ती राजुऱ्यात आली असता, तो तिला राजुरा येथीलच आपल्या एका मित्राच्या घरी घेऊन गेला. त्या निर्जन आणि शांत ठिकाणी नेऊन आरोपीने “माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे” असे सांगत तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरीने अत्याचार केला.
या धक्कादायक प्रकारामुळे आणि आरोपीच्या धमक्यांमुळे सदर अल्पवयीन मुलगी प्रचंड हादरून गेली होती. मानसिक धक्क्यात असलेल्या मुलीने भीतीने काही दिवस हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. मात्र, तिच्या वागण्यातील बदल आणि चेहऱ्यावरील भीती पाहून पालकांनी तिला विश्वासात घेतले असता, तिने आपल्यासोबत घडलेला हा संपूर्ण भयानक प्रसंग घरच्यांना सांगितला. मुलीवर झालेला हा अन्याय ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने मुलीला सोबत घेऊन राजुरा पोलीस स्टेशन गाठले आणि आपबिती सांगितली.
घटनेचे गांभीर्य ओळखून राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांनी तातडीने चक्र फिरवली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री उशिरा आरोपी अरबाज चाऊस याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने शोधमोहीम राबवून नराधम आरोपी अरबाज चाऊस याला तात्काळ अटक केली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मुलांवर लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






