Maharashtra Crop Insurance 2026 PMFBY registration online for farmers

चंद्रपूर जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 11, 2026

चंद्रपूर – : राज्यात Maharashtra Crop Insurance 2026 अंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी ही योजना लागू असेल. शेतकरी बांधवांना या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

Maharashtra Crop Insurance 2026 अंतर्गत शेतकरी आयडी सक्तीचा

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विद्यमान अटी व शर्तीनुसार खरीप 2026 आणि रब्बी 2026-27 या एक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. (मागासवर्गीय व दिव्यांग बांधवासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेची कल्याणकारी योजना)

योजनेची वैशिष्ट्ये: 1. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे बंधनकारक आहे. 2. शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी डिजिटल पीक सर्व्हेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. 3. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर मर्यादा राहील. 4. ही योजना अधिसुचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसुचित क्षेत्रासाठी लागू असेल.

5. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. 6. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. 7. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे. 8. बोगस किंवा फसवणूकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळुन आल्यास, संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या डीबीटी द्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून पाच वर्ष बंदी घालण्यात येईल.

योजना कार्यान्वीत यंत्रणा : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे या विमा कंपनीकडून राबविण्यात येत असून कंपनीचा पत्ता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, 9 वा मजला, ऑफिस ए, वेस्टलँड सेंटर वन बिल्डिंग, बी सेक्टर परिहार चौकाजवळ, डी.पी. रोड, औंध, पुणे, ईमेल आयडी supportagri@iffcotokio.co.in.

खरीप 2026 मध्ये विमा संरक्षण / जोखमीच्या बाबी : योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पीकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय राहील.

विमा संरक्षित रक्कम / विमा हप्ता : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंमाम 2026 साठी पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. 1) भात (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 65 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 1300 रुपये) 2) ख. ज्वारी (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 33 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 330 रुपये), 3) सोयाबीन (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 62500 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 1250 रुपये), 4) तूर (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 47 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 940 रुपये) 5) कापूस (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 65 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 1300 रुपये).

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप 2026 हंगामाकरीता विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरू करण्यात आले आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment