ballarpur theft case

बल्लारपुरातील २३ लाखांची घरफोडी; ७ जण कसे अडकले?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

बल्लारपूर: (ballarpur theft case) चा छडा लावण्यात बल्लारपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. शिवाजी वार्डात राहणारे व्यावसायिक राजवीरसींह सनवाल यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २३ लाख ७४ हजार १०० रुपयांची चोरी झाली होती. पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून दोन मुख्य चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या ५ सराफांना अटक केली आहे. सर्व आरोपींकडून २१ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. (पगार थकला, आणि गुन्हा घडला, पोलिसांनी अशी केली अटक)

ballarpur theft case : २३ लाखांच्या चोरीचा मास्टरमाइंड अटकेत

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, बल्लारपूर येथील शिवाजी वार्डात राहणारे ६० वर्षीय व्यावसायिक राजवीरसींह धनसींह सनवाल यांच्या राहत्या घरातून २७ जून २०२६ पूर्वी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान साहित्य असा एकूण २३ लाख ७४ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी राजवीरसींह सनवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक आरोपींच्या शोधात होते. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे मोबाईल लोकेशन आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. या तपासातून चंद्रपूर येथील अष्टभुजा वार्डात राहणारा २३ वर्षीय रोहित कनाई मंडल हा पोलिसांच्या रडारवर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच आपला साथीदार शुभम जयसिंग उईके (वय २३ वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर) याच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी रात्रीच्या वेळी मोबाईल लोकेशन ट्रॅक करून शुभम उईके याला चंद्रपूरमधून ताब्यात घेतले.

या दोन्ही मुख्य आरोपींची पंचांसमक्ष कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरलेला काही मुद्देमाल आधीच विकल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये चोरीचा माल खरेदी करणारे अब्दुल हमीद कादीर शेख (वय ५१ वर्ष), गन्नी उर्फ जनार्धन रमेश सोनी (वय २२ वर्ष), संजू चंदेश्वर सोनी (वय २५ वर्ष), राजेश महेश सोनी (वय ४६ वर्ष, सर्व रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर) आणि हनमंत जगन्नाथ बाबर (वय ४६ वर्ष, रा. समाधी वार्ड, चंद्रपूर) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. हे दागिने चोरीचे आहेत हे माहित असतानाही त्यांनी खरेदी केल्याने या पाचही जणांना गुन्ह्यात सह-आरोपी करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण २१ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संतोष पंडित, लालू यादव, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, सत्यवान कोटनाके, पंकज शिंदे, भास्कर चिंचवलकर, नायक पोलीस अंमलदार सचिन आलेवार, पोलीस अंमलदार महेश कुकुडकर, लखन चव्हाण, वैभव गाडगे, शरदचंद्र कारूष, मिलिंद आत्राम आणि महिला पोलीस अंमलदार अनिता नायडू यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. बल्लारपूर पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे फिर्यादीसह नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment