Google Pay Fraud – वरोऱ्यात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची घटना

मोबाईल रिसेट झाला अन् खात्यात उरले फक्त ७९ रुपये; वरोऱ्यात सायबर फसवणूक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 12, 2026

चंद्रपूर: Google Pay Fraud प्रकरणात वरोरा येथे एका तरुण कामगाराची ६८ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाली आहे. सुनील सुरपसिंह भयडिया (वय २१) असे फसवणूक झालेल्या कामगाराचे नाव आहे. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. मोबाईल रिसेट झाल्यानंतर खात्यात केवळ ७९ रुपये शिल्लक असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी IT Act आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Google Pay Fraud: वरोऱ्यात कामगाराच्या खात्यातून ६८,९०० रुपये ट्रान्सफर

मोबाईलची संधी साधत अज्ञात सायबर भामट्याने गुगल पे (Google Pay) द्वारे परस्पर ६८ हजार ९०० रुपयांची रक्कम इतरत्र वळवून एका कामगाराची फसवणूक केल्याची घटना वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर गुन्हेगारीच्या या प्रकारामुळे कामगार वर्गात खळबळ उडाली आहे. (ट्र्क च्या धडकेत दुचाकीस्वार ठार, वाचा बातमी)

सुनील सुरपसिंह भयडिया (वय २१, मूळ रा. चिलकदा, पो. मतवाद, जि. अलीराजपुर, मध्य प्रदेश; हाल मुक्काम: महालक्ष्मी कंपनी बोर्डा, वरोरा, जि. चंद्रपूर) असे फसवणूक झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. सुनील हा महालक्ष्मी कंपनीत डोजर ऑपरेटर म्हणून कामाला असून, कंपनीच्या कामगारांसोबत एकाच खोलीत राहतो. त्याच्याकडे असलेल्या अँड्रॉइड मोबाईलमधील जिओ क्रमांकावर त्याचे पंजाब नॅशनल बँक, वरोरा शाखा येथील बचत खाते लिंक केलेले आहे आणि तो याद्वारेच आपले सर्व ऑनलाईन व्यवहार करतो.

आंघोळीसाठी गेला अन् परतल्यावर मोबाईल रिसेट झाल्याचे दिसले, Google Pay Fraud

घटनेच्या दिवशी, म्हणजेच ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ड्युटीवरून आल्यानंतर सुनीलने आपल्या खोलीवर चुलत भाऊ पंकज कनज याला गुगल पे द्वारे २००० रुपये पाठवले होते. त्यानंतर त्याने आपला मोबाईल चार्जिंगला लावून तो आघोळ करण्यासाठी निघून गेला. त्या खोलीवर त्यावेळी नाईट शिफ्ट करणारे इतर कामगार झोपले होते. साधारण पंधरा मिनिटांनंतर तो परत आल्यावर त्याने मोबाईल पाहिला असता त्याचा मोबाईल रिसेट झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर तो वरोरा येथे जेवणासाठी गेला आणि जेवणाचे पैसे ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न करताना त्याच्या खात्यात केवळ ७९ रुपये शिल्लक असल्याचे त्याला दिसले.

सायबर पोर्टलवर तक्रार करूनही पैसे न मिळाल्याने पोलिसांत धाव, Google Pay Fraud

आपल्या मित्रांना मोबाईल दाखवून तपासणी केली असता, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:०५ ते १२:३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलचा ताबा घेत गुगल पे द्वारे दिवलाल गोस्वामी नामक इसमाच्या मोबाईल क्रमांकावर ६८ हजार ९०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनीलने तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली, ज्याची तक्रार क्रमांक ३१९०६२६०१२३१४९ अशी आहे. तसेच पंजाब नॅशनल बँक शाखा वरोरा द्वारे त्याचे पैसे होल्ड झाल्याची प्राथमिक माहिती त्याला मिळाली होती. सुरुवातीला सायबर पोर्टल आणि बँकेच्या माध्यमातून पैसे परत मिळतील या अपेक्षेने त्याने फिर्याद दिली नव्हती, परंतु रक्कम परत न मिळाल्यामुळे त्याने ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी वरोरा पोलीस ठाण्यात येऊन मौखिक फिर्याद नोंदवली.

IT Act आणि BNS अंतर्गत वरोरा पोलिसांकडून गुन्हा दाखल, Google Pay Fraud

तक्रारदाराच्या या जबानीनुसार वरोरा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६ (ड) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ज्ञानोबा जांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “मोबाईल रिसेट झाला अन् खात्यात उरले फक्त ७९ रुपये; वरोऱ्यात सायबर फसवणूक”

Leave a Comment