राजुरा : राजुरा पोलीस स्टेशन अस्वच्छता हा विषय आता नागरिकांच्या चर्चेत आला आहे. पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात “थुंकल्यास २०० रुपये दंड” असा फलक आहे. मात्र, फलकाच्या आजूबाजूला खर्रा-तंबाखूच्या थुंकीचे डाग दिसत असल्याचे निदर्शनास आले. हे डाग कोणी केले, हे स्पष्ट नाही. मात्र नियम सर्वांना समान लागू व्हावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
राजुरा पोलीस स्टेशन अस्वच्छता: फलकाजवळ काय दिसले?
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, तसेच खर्रा, तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून परिसर अस्वच्छ न करण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी कठोर नियम व निर्देश दिले जातात. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी प्रशासनाची असते आणि नागरिकांनीही त्याचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असते. मात्र, कायद्याची आणि स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्याच राजुरा पोलीस स्टेशन परिसरातील एक चित्र या संपूर्ण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे. (News३४ च्या बातमीनंतर जुगार अड्ड्यावर कारवाई, वाचा बातमी)
“थुंकल्यास २०० रुपये दंड” फलक, राजुरा पोलीस स्टेशन अस्वच्छता
पोलीस स्टेशनच्या आवारात खर्रा, तंबाखू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्यांना दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देणारा फलक राजुरा पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. असे असतानाही, याच पोलीस स्टेशन परिसरातील आणि फलकाच्या आजूबाजूच्या ठिकठिकाणी विचित्र लाल रंगाच्या स्वरूपात खर्रा व तंबाखू खाऊन थुंकण्याचे प्रकार उघडपणे निदर्शनास येत आहेत, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी खर्रा व तंबाखूचे सेवन करू नये, परिसरात थुंकू नये आणि नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा शब्दांत वारंवार कडक सूचना दिल्या जातात. सामान्य नागरिकांना नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांची टीम सातत्याने समज देत असते. मात्र, ज्या नियमांचे पालन करण्याचा आग्रह सामान्य लोकांकडे धरला जातो, त्याच नियमांची पायमल्ली खुद्द पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधव व इतर शासकीय कर्मचारी करताना दिसत आहेत का, असा गंभीर सवाल आता सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
नियम सर्वांना समान लागू होतात का?, राजुरा पोलीस स्टेशन अस्वच्छता
शासनाचे हे नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहेत का आणि शासकीय कर्मचारी व पोलीस प्रशासनाला हे नियम लागू नाहीत का, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. पोलीस स्टेशनसारख्या कायद्याची आणि शिस्तीची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या परिसरातच जर नियमांना केराची टोपली दाखवली जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडून कोणता आदर्श घ्यावा, हे समजेसे झाले आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेनेच सर्वप्रथम स्वतः कायद्याचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून समाजात एक उत्तम आदर्श निर्माण करणे अपेक्षीत असते. केवळ भिंतीवर फलक लावून किंवा सामान्य नागरिकांना केवळ दंडाची भीती दाखवून स्वच्छता राखली जाणार नाही, तर संबंधित नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान पद्धतीने होणे अत्यंत गरजेचे आहे.
राजुरा पोलीस स्टेशन अस्वच्छता, समान कारवाईची मागणी
या सर्व प्रकारामुळे राजुरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पोलीस स्टेशन परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी, खर्रा व तंबाखू सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या प्रकारांना कठोरपणे आळा घालावा आणि नियमांचे उल्लंघन करणारे पोलीस कर्मचारी असोत वा सामान्य नागरिक, त्यांच्यावर कोणताही भेदभाव न करता नियमानुसार कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. ‘नियम सांगणाऱ्यांनीही नियम पाळले पाहिजेत आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायद्याचा खरा आदर्श घालून दिला पाहिजे,’ हीच आजच्या जनतेची ठाम अपेक्षा आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







