चंद्रपूर : तंबाखूमुक्त युवा अभियान चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते सोमवारी (२ नोव्हेंबर) अभियानाचा शुभारंभ झाला. युवकांमध्ये तंबाखू सेवन कमी करणे आणि मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणे हा हेतू आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे अभियान राबवले जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती होईल. रॅली, प्रभातफेरी आणि चित्रकला-निबंध स्पर्धा घेतल्या जातील. तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन आणि आरोग्य मदतही मिळणार आहे. (जुनी पेन्शन योजना लागू होणार, मंत्रालयात बैठक, वाचा बातमी)
युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करणे, मुखाचा कर्करोग व इतर तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करणे तसेच निरोगी आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज (दि. 2) करण्यात आला.
तंबाखूमुक्त युवा अभियान: काय आहेत उद्दिष्टे?
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, तंबाखुमुक्त युवा अभियान 4.0 अंतर्गत शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन, शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त परिसर निर्माण करणे, कोटपा कायदा, 2003 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध आणि अल्पवयीनांना तंबाखू विक्रीवरील बंदीबाबत जनजागृती, रॅली, प्रभातफेरी, चित्रकला, निबंध स्पर्धा आणि तंबाखूमुक्तीची शपथ, तसेच तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन व आरोग्यविषयक मदत हे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, तरुण पिढीमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. आपली युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून, याबाबत नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कडक कारवाई करावी. वसतीगृह तसेच आश्रमशाळेसुध्दा नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. जनजागृतीपर संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, दंत शल्य चिकित्सक डॉ. संदीप पिपरे, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. श्वेता सावलीकर, अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, प्रणय कांबळे, उपशिक्षणाधिकारी जी.बी. चवरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकर आदी उपस्थित होते.
विविध विभागाच्या वतीने करण्यात आलेली कार्यवाही : सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (कोटपा) अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत 396 जणांवर दंडात्मक कारवाई करून 39 हजार 600 रुपयांची वसुली करण्यात आली. याच कालावधीत पोलिस विभागाच्या वतीने 2459 जणांवर कारवाई तर 4 लक्ष 85 हजार 677 रुपये दंड आकारण्यात आला. अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सदर कालावधीत 27 लक्ष 29 हजार 477 रुपये किमतीचा 1331 किग्रॅ साठा जप्त करण्यात आला. जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये 314 शाळा तंबाखुमुक्त, सन 2025-26 मध्ये 322 शाळा तर एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत आतापर्यंत 65 शाळा तंबाखुमुक्त करण्यात आल्या आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






