वेडगाव गुन्हा प्रकरणातील महिलेच्या घराचे बाह्य दृश्य

मी डॉन आहे, माझं कुणी काही बिघडवू शकत नाही, महिलेच्या घरात घुसखोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 20, 2026

गोंडपिंपरी – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील वेडगाव (गुन्हा ) येथे एका महिलेच्या घरात घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात प्रवेश करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप शेजारी राहणाऱ्या इसमावर करण्यात आला आहे. या प्रकरणी लाठी उपपोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९:२४ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

वेडगावमध्ये घरातील सामान विस्कटलेले आढळले, वेडगाव गुन्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील वेडगाव येथे एकटी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसखोरी करून अश्लील शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीसाठी अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजारी राहणाऱ्या इसमाने दारूच्या नशेत धिंगाणा घालत दहशत माजवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, याप्रकरणी लाठी उपपोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (बँक अधिकाऱ्याला गंडविले, वाचा सविस्तर)

प्रथम खबर अहवालातील माहितीनुसार, तक्रारदार मालन भोजराज भोयर (वय ४२, धंदा मजुरी, रा. वेडगाव, ता. गोंडपिंपरी, जि. चंद्रपूर) या वरील पत्त्यावर एकट्याच राहतात. त्यांचे पती पाच वर्षांपूर्वी निधन पावले असून त्यांची दोन्ही मुले कामासाठी बाहेरगावी राहतात; मजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या घराशेजारी पद्माकर दिवाकर मानकर (रा. वेडगाव, ता. गोंडपिंपरी) हा आपल्या कुटुंबासह राहत असून तो नेहमी दारू पिऊन गावकऱ्यांशी शिवीगाळ व वाद घालत असतो. त्याचे आणि तक्रारदार यांचे आपसात पटत नसल्याने बोलणे बंद आहे. (वेडगाव गुन्हा)

घटनेच्या दिवशी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या आपल्या आईला डोळ्यांच्या त्रासामुळे तपासणीसाठी त्या गोंडपिंपरी येथे घेऊन गेल्या होत्या. तपासणी आटोपून आईसह त्या दुपारी साडेचार वाजता वेडगाव येथील घरी परतल्या. घरात गेल्यावर ठेवलेले जेवण पसरलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना आढळून आले. घरात कोणीतरी घुसल्याचा संशय आल्याने त्यांनी मेव्हणे सुभाष दुर्गे यांना फोन करून विचारणा केली. आपण घरी आलो नसल्याचे सांगत शेजारी राहणारा पद्माकर मानकर घरात घुसला असल्याची माहिती सुभाष दुर्गे यांनी दिली.

त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता पद्माकर मानकर हा तक्रारदार यांच्या घराकडे आला आणि घरात घुसल्याचे सुभाषने सांगितल्याचे म्हणत त्याने सुभाषला बोलावून आणले. आपले नाव का सांगितले, असा जाब विचारत त्याने तक्रारदार आणि सुभाष दुर्गे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने अश्लील शिवीगाळ करत आपण वेडगावचा डॉन असून आपल्याला कोणीही काही करू शकत नाही आणि सर्वांचा नाश करतो, अशी धमकी देत तो मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी भीमराव मानकर, समीर शामराव मानकर आणि वहिनी मंगला ढोलके हे हा प्रकार पाहत होते, मात्र आरोपी गुंड प्रवृत्तीचा असल्याने कोणीही भांडण सोडवण्यासाठी पुढे आले नाही.

आरोपी नेहमी दारूच्या नशेत वाद घालून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे. घरात वाहन नसल्याने, संध्याकाळी अंधार पडल्याने आणि जंगल मार्ग असल्याने गावातील मारोती नागपूरे यांची गाडी भाड्याने करून त्या मेव्हण्यासह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. या तक्रारीवरून लाठी उपपोलीस ठाण्यात पद्माकर दिवाकर मानकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९६, ३३२(क) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार ममता सुनील मडावी यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला असून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment