चंद्रपूर, दि. २१ : चंद्रपूर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या एकवेळ समझोता (ओटीएस) घटकात जिल्ह्यातील ३ हजार ७४७ शेतकरी पात्र ठरले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २ हजार ९६२ आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ७८५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील स्वतःचा हिस्सा ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत जमा करायचा आहे. (चंद्रपूर पालकमंत्री हटाव स्वाक्षरी मोहीम)
महाराष्ट्र शासनाच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) घटकाची पहिली यादी चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. या पहिल्या यादीत जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७४७ शेतकरी पात्र ठरले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २ हजार ९६२ शेतकऱ्यांचा, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या ७८५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ३,७४७ शेतकरी पात्र, चंद्रपूर शेतकरी कर्जमुक्ती
या योजनेत संपूर्ण कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहन असे तीन घटक असून, पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्या टप्प्यात राज्यातील २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या, ज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ५३ हजार ४७३ शेतकरी पात्र ठरले होते.
ओटीएस योजनेतून दोन लाखांचा कर्जमुक्ती लाभ, चंद्रपूर शेतकरी कर्जमुक्ती
आता दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतून पात्र शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील आपल्या हिश्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायत, बँकेच्या शाखा आणि विकास संस्थांच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएसनुसार थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासकीय लाभाची रक्कम आदी माहिती नमूद आहे.
पात्र शेतकऱ्यांनी बँकेत किती रक्कम भरायची?, चंद्रपूर शेतकरी कर्जमुक्ती
शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून दोन लाखांवरील आपल्या हिश्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करायची आहे. ज्यांचे कर्जखाते एकाच बँकेत आहे, त्यांनी त्याच कर्जखात्यात रक्कम भरावी; तर एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही एका कर्जखात्यात रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याबाबत योग्य ती माहिती घेऊनच रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिश्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी रक्कम भरल्याची अद्ययावत माहिती दर शुक्रवारी बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि त्याची माहिती शेतकऱ्याला कळविणे आवश्यक राहील. पोर्टलवर थकबाकी अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर आणि शेतकऱ्याचा हिस्सा भरणा झाल्यानंतर शासनाकडून दोन लाखांची रक्कम वर्ग करून शेतकऱ्याला कर्जमुक्ती दिली जाईल.
एकवेळ समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या पुढील याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






