चंद्रपूर : कर्जमुक्ती तिसरी यादी चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील ३४१० पात्र शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यापैकी ३१२ शेतकरी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. उर्वरित ३०९८ शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांचे आहेत. राज्य शासनाने ही यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली. शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (ओमॅट कंपनीत कामगाराचा मृत्यू, धानोरकराची मध्यस्ती, १० लाख मदत, वाचा बातमी)
कर्जमुक्ती तिसरी यादी : चंद्रपूर जिल्ह्यात किती शेतकरी?
महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी महाआयटीमार्फत ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. राज्यातील विविध बँकांनी एकूण 31 लाख 17 हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानुसार 24 जुलै 2026 रोजी राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी, 11 सप्टेंबर 2026 रोजी 4 लाख 20 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि 12 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बँक शाखा व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध होणार यादी : चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या 3410 शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी आपले नाव तपासून 31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करावी. त्यानंतर नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
या यादीतील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार संबंधित कर्ज खाती निरंक करण्यात येणार आहेत.
आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन : पात्र शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व 3410 शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० शेतकऱ्यांचा समावेश”