चंद्रपूर: राष्ट्रीय कुणबी महासंघ निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी त्यात आहे. निवेदन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरीकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वाखाली दिले गेले. अपुरा पाऊस आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात असल्याचे महासंघाने म्हटले आहे. ई-पीक पाहणीची अट रद्द करावी, अशी प्रमुख मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. (कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, वाचा बातमी)
राष्ट्रीय कुणबी महासंघ निवेदन : प्रमुख मागण्या कोणत्या?
महाराष्ट्रात अपुरा व अनियमित पाऊस, पावसातील मोठे खंड आणि पिकांच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी तसेच ई-पीक पाहणीसह जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी का?
शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण शेतकरी व कुणबी समाज रस्त्यावर उतरेल, असा थेट इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ई-पीक पाहणी करताना लोकेशनसह अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे विशेषतः वयोवृद्ध शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करून प्रत्यक्ष शेतातील नुकसानीचे महसूल, कृषी विभाग व ग्रामपंचायतीमार्फत पंचनामे करावेत, तसेच केवळ ऑनलाइन नोंदीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पीक विम्याचे प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढणे, तलाठी किंवा कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप टाळून ‘फार्मर आयडी’च्या माध्यमातून थेट आर्थिक मदत देणे, दुष्काळग्रस्त भागातील कृषी कर्जांचे पुनर्गठन करून व्याजमाफी करणे, थकबाकीमुळे कृषी वीज कनेक्शन न तोडता वीजबिले माफ करणे, दसऱ्यापूर्वी आर्थिक मदत देणे आणि तक्रार निवारणासाठी तालुका व जिल्हास्तरावर स्वतंत्र मदत कक्ष सुरू करणे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन देताना राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष डी. के. आरीकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजू कुडे यांच्यासह आशिष येडांगे, हनुमंत नागपुरे, अतुल ठाकरे, विद्याताई ठाकरे, सुधीर कोरडे, विजय ठाकरे, संजय फाले आणि ॲड. प्रफुल्ल मुरकुटे आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






