चंद्रपूर : चंद्रपूर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. पत्रात नमूद केल्यानुसार, अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागांत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकसानीच्या मूल्यांकनासाठी केंद्रीय पाहणी पथक पाठवावे, अशीही त्यांची मागणी आहे. (जटपुरा गेटच्या संरक्षणासाठी आमदार मुनगंटीवार यांचा पुढाकार, वाचा बातमी)
चंद्रपूर दुष्काळी परिस्थिती : पत्रात काय म्हटले?
चालू वर्षात अनियमित, अपुरा आणि अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून राज्यातील भीषण परिस्थितीकडे केंद्र सरकारचे तातडीने लक्ष वेधले आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे आणि पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
पिके, पाणी आणि चाऱ्याची टंचाई
पावसाच्या अनियमिततेमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागांत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके पूर्णपणे वाळली आहेत. यामुळे शेतीसाठी झालेला मूळ खर्च निघणेही अशक्य झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती पिकांच्या नुकसानीसोबतच आता चंद्रपूर जिल्ह्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण भागात रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाच्या या भीषण छायेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे मनोबल पूर्णपणे खचले असल्याचे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
या आपत्कालीन परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून त्याद्वारे प्रभावित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफी करावी, बियाणे व खतांवर सबसिडी उपलब्ध करून द्यावी, तसेच पीक नुकसानीचा तात्काळ मोबदला देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दुष्काळाच्या वास्तविक तीव्रतेचे आणि नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचे एक विशेष केंद्रीय पाहणी पथक महाराष्ट्रात पाठवावे, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा देशाचा मुख्य आधारस्तंभ असल्याने या कठीण काळात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने मदत पोहोचवावी, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “चंद्रपूर दुष्काळी परिस्थिती : खासदार धानोरकर यांची केंद्राकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी”