बल्लारपूर: बल्लारपूर महिला गार्डनच्या मागणीसाठी प्रभाग क्रमांक ३ मधील मक्का मस्जिद परिसरातील महिलांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. महिलांनी सामूहिक निवेदनाद्वारे शौचालय दुरुस्ती, पाणीव्यवस्था आणि स्वच्छतेच्या समस्या मांडल्या. नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही न झाल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित जागेवर गार्डन विकसित करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले. (हनुमान मंदिराचा विकास आराखडा तयार, वाचा)
बल्लारपूर महिला गार्डन: मक्का मस्जिद परिसरातील महिलांची मागणी
शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील मक्का मस्जिद परिसरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या स्थानिक महिलांनी थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचा पाढा वाचला. परिसरातील सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरवस्था, पाणीटंचाई, नियमित स्वच्छतेचा अभाव, जागोजागी साचलेला कचरा तसेच नाल्या व चेंबरच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
सार्वजनिक शौचालय, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या, बल्लारपूर महिला गार्डन
या मूलभूत समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर महिलांनी सामूहिक निवेदनाद्वारे आमदारांकडे धाव घेतली. या निवेदनातून सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती, पुरेशी पाणीव्यवस्था, परिसराची नियमित स्वच्छता आणि मोकळ्या जागेला संरक्षक कुंपण घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच परिसरातील अंदाजे ११०० ते १२०० चौरस फूट मोकळ्या जागेवर महिलांसाठी स्वतंत्र गार्डन, ओपन जिम, बसण्यासाठी बाक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची विशेष मागणीही महिलांनी केली.
महिलांच्या या मागण्यांची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित जागेवर गार्डन विकसित करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. आमदारांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता गार्डनचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि प्रलंबित नागरी समस्यांचा निपटारा केव्हा होणार, याकडे प्रभागवासीयांचे लक्ष लागले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






